शासकीय चाऱ्यावर अतिक्रमण करणारांची धाकधूक वाढली

शासकीय चाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना जलनि:सारण विभागाने काढल्या नोटीसा

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपालीकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम आजून शमली नाही. आता फक्त रस्ते मोकळे झाले आजुन रहिवाशी व वाणिज्य अर्थात व्यापारी संकुलाचे बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकण्याची योजना पालीका प्रशासन आखत असल्याने चिंतेत असलेल्या कोपरगाव शहरातील नागरीकांना आता उपविभागीय अभियंता गोदावरी कालवे जलनि:सारण उपविभाग कार्यालय कोपरगाव यांच्यावतीने शहरातील शासकीय चाऱ्यावर अनाधिकृत बांधकाम करुन अतिक्रमण  केलेल्यांना जलनि:सारण विभागाने नुकत्याच नोटीसा पाठवून अतिक्रमण काढून घेण्याच्या सुचना दिल्याने चाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

सर्वसाधारण नागरीकांना नेहमी गटार वाटणारी अर्थात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पालीकेने व्यवस्था केली असावी असा अंदाज बांधून काहींनी त्या नाल्याच्या शेजारी अर्थात चारीलगत कच्चे पक्के बांधकाम केले. काहींनी बगीचा फुलवा काहींनी संरक्षण भिंती उभ्या केल्या तर काहींनी  घराचे सांडपाणी जाण्यासाठी शौचालयाच्या टाक्या टाकल्या.

नाल्याच्या शेजारी कधीच कोणी काही करणार नाही असा गैरसमज करुन स्वमालकीची जागा असल्याचा वापर करीत होते. काही ठराविक स्थानिक नागरीकांना संबंधीत चाऱ्या ह्या शासकीय असल्याची जाणीव असेलही त्यामुळे त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून बांधकाम केले आहे. तर काहींनी थेट चारीला आपलंसं केले.

 दरम्यान गोदावरी कालवे जलनि:सारण उपविभाग कार्यालयाचे कनिष्ठ शाखा अभियंता किशोर शिंदे यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी २० चाऱ्या ह्या शासकीय मालकीच्या असुन त्याचे भूसंपादन सन १९७२ साली करण्यात आले आहे. एका चारीची रूंदी सरासरी २० ते ३० मिटर आहे.

सध्या जरी अतिक्रमणामुळे चाऱ्या छोट्या दिसत असल्या तरी त्यांची रूंदी मोठी आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र कालवे जलनि:सारण  या  विभागाची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन या विभागाच्या मालकीची आहे. त्या जमिनींचे रक्षण करण्याची जबाबदारी कोपरगाव कार्यालयाकडे आहे.

कोपरगाव अंतर्गत निफाड, येवला, सिन्नर, राहता व कोपरगाव तालुक्यातील ४५ चर योजना आहेत. एकट्या कोपरगाव शहरात तब्बल ७ हेक्टर १३ गुंठे जमीनीवर चाऱ्या असुन त्यात येसगांव- खडकी ते गोकुळ नगरी पर्यंत मुख्य चर आहे तर टिळेकर वस्ती ते साई सिटी लगतचा परिसर, खडकी रोड  निवारा ट्रेडर्स पर्यंत २० मिटर रुंदीचा चर आहे. येथे अतिक्रमण करणाऱ्यांना अतिक्रमणे  काढण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे शासकीय जागेत होणारे अतिक्रमण काढण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

तसेच तालुक्यातील गोदावरी डाव्या तट कालव्या वरील ८ चर  योजना असुन त्यात खिर्डी चर १, खिर्डीगणेश चर २, पढेगाव, दहेगाव बोलका, टाकळी ब्राम्हणगाव, कोपरगाव शहर, वळुमात प्रकल्प आदी ठिकाणी चर योजना अनेक किलोमीटर लांबीच्या आहेत तसेच गोदावरी उजव्या तट कालव्यावर १२ चर योजना असुन त्यात मढी खु., मढी ब., माहेगाव देशमुख, सुरेगाव, कोळगाव, वेळापुर, मंजूर, पोहेगाव, डाऊच, हॅरिसन ब्रॅंच, चासनळी आदींचा सामावेश आहे. 

या सर्व चरावरती विविध शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन शेतीसह निवासी व इतर अतिक्रमण केले आहे. या सर्व अतिक्रमणधारकांना संबंधीत विभागाने वेळोवेळी सुचना देवूनही अतिक्रमण काढले नसल्याने येत्या काळात योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती अभियंता किशोर शिंदे यांनी दिल्याने चाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कधीच स्वप्नात विचार न केलेली कारवाई होणार असल्याने नागरीक चिंताग्रस्त झाले आहेत.  शहरातील १९ अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्याने चराच्या शेजारच्या घरांना चर पडण्याची शक्यता दाट आहे.

‌शहरातील शासकीय मालकीच्या चाऱ्याची सध्या देखभाल दुरुस्ती करण्याची पुर्तता संबंधीत विभागाकडून वेळोवेळी होत नसल्याने आगामी काळात ह्या चाऱ्या जमीनीसह नगरपालीकेच्या ताब्यात देण्याची तजवीज करीत आहोत. – कनिष्ठ शाखा अभियंता, किशोर शिंदे 

Leave a Reply