स्वस्तात प्लाॅट देण्याचे आमिष दाखवून टाकळी परिसरातील २९ जनांना ४६ लाखांचा गंडा

लुबाडणारा कोपरगाव पोलीसांच्या ताब्यात

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : स्वस्तात प्लाॅट देण्याचे आमिष दाखवून गरीब व भोळ्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो  रुपये घेत संबधीतांच्या नावावर प्लाॅट व फ्लॅट न करता बनावटगिरी करुन कोपरगाव  तालुक्यातील टाकळी, पुण्यातील कोंडवा व निगडी येथून कोट्यावधींची माया गोळा फरार असलेला परराज्यातला ठकसेन डेव्हलपर शिवम बनवारीलाल दास याला कोपरगाव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचा साथीदार दिपक शिवकरण हा अजुनही फरार आहे.

 या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात गट क्रं. ४१६, १७ व १८ मधील शेतीवर बिगरशेती गुंठेवारी प्लाॅट पाडून एक लाखात विक्रीचे आमिष मध्यप्रदेशातील राहणारा व सध्या पुण्याच्या वडगाव शेरी येथे राहून डेव्हलपमेंटचे कामे करतो असं सांगणारा शिवम बनवारीलाल दास याने नागरीकांना दाखवले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून परिसरातील गोरगरीब शेतमजूर, ऊसतोडणी करणाऱ्या तब्बल २९ जनांनी आपल्या निवाऱ्यासाठी कर्ज काढून  ४६ लाख २ हजार ८०० रुपये दिले. पैसे घेतले पण प्लाॅट काही नावावर करुन दिले नाही.

सन २०२१  साली व्यवहार झाला तरी प्लाॅट नावे होत नसल्याने अखेर २७ मार्च २०२३ रोजी अरुण बयाजी आहेर रा. टाकळी यांच्यासह इतर २९ जनांच्या तक्रारी वरुन कोपरगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दरम्यान संबंधीत आरोपी शिवम बनवारीलाल दास व त्याचा सहकारी दिपक शिवकरण  हे दोघेही फरार झाले तसेच या दोघांनी टाकळी येथील प्लाॅटची तीच जमीन पुन्हा अजय पन्नालाल रांदन या व्यक्तीला विकल्याचे समजल्याने आगोदर पैसे दिलेल्या गरीबांची अधिकच धाकधूक वाढली.

कोपरगाव पोलीस गेल्या वर्षभरापासून या दोन ठकांचा शोध घेत होते अशातच पुण्यातील निगडी पोलीसांच्या ताब्यात शिवम बनवारीलाल दास हा ताब्यात असल्याची माहीती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजताच पोलीस उपनिरीक्षक हांडोरे व त्यांच्या पथकाने पुण्यात जावून त्याला ताब्यात घेतले. कोपरगाव न्यायालयात त्यांला हजर केले असता ५ दिवसांची पोलीस  कोठडी देण्यात आली आहे.

 दरम्यान परराज्यातून येवून  कोपरगावसह पुण्यातील व  इतर ठिकाणी अनेकांची फसवणूक करून कोट्यावधींची माया गोळा केल्याचे उघड झाले आहे.  पुण्यातील निगडी येथे याच दोघांवर असाच फसवणुकीचा गुन्हा दाखल असुन तिथे  १ कोटी ३५ लाखांची फसवणूक केली तर कोंडवा येथेही गुन्हा दाखल असुन तिथे ६५ लाखांची फसवून केल्याचा गुन्हा सध्या उघड झाला आहे. ते महाराष्ट्रासह देशातील मध्यप्रदेश, इंदौर, छत्तीसगड, रायपूरसह अनेक ठिकाणी फिरत होते. यावरून आणखी किती ठिकाणी लोकांची अशीच फसवणूक केली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

 कोपरगाव तालुक्यात आरोपी शिवम बनवारीलाल दास व दिपक शिवकरण यांनी ज्यांची ज्यांची फसवणूक केली आहे अशा नागरीकांनी कोपरगाव शहर पोलीसांशी  संपूर्ण साधून गुन्हा दाखल करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.