कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : योग दिनानिमित्त कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्था संचालित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे व शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून योग प्रशिक्षक दिपक घोडले, माधुरी घोडले व एम.के. आढाव विद्यालयाचे माजी क्रीडा प्रमुख रामराव पाटील साबळे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम, योगासने व सूर्यनमस्कार असे योगातील वैविध्यपूर्ण प्रकारांच्या योगासनांचे सादरीकरण शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी केले.

शरीर व मनातील समतोल साधत ताणतणाव दूर कसा करावा हे सर्वांना शिकविणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. हसतखेळत योगासने शिकल्याने या विद्यार्थ्यांमध्ये रस निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची तयारी करत असताना मुलांमध्ये सळसळणारा उत्साह जाणवत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी योगसूत्र सादर केले. प्राणायम, सूर्यनमस्कार, ताडासन, अर्थ चक्रासन, शशांकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन इत्यादी विविध योगमुद्रांची प्रात्यक्षिकेही त्यांनी दाखवली. विविध आसने, प्राणायम आणि ध्यानधारणेचे विशिष्ट फायदे आणि योगासनाचे हे प्रकार कसे करावेत याची माहिती देण्यावर योग प्रशिक्षक दिपक घोडले यांनी भर दिला.

स्वास्थ्य जपण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी योगासाधना करण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रोत्साहित केले. तसेच योगासने, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार या प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. शाळेच्या शिक्षिका उमा गिरमे यांनी योग दिनाची माहिती दिली, सूत्रसंचालन शिक्षिका पूनम सूर्यवंशी यांनी केले तर आभार शाळेच्या उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
