वाहतूक आणि रस्ते अवस्था याबद्दल माजी आमदार कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा देवस्थानं शिर्डी , सदगुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम, आत्मा मालिक ध्यानपीठ येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी येते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुसूत्र आयोजनासाठी नियोजन पाहणी पार पडली.

मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी आत्मा मालिक ध्यानपीठाचे महंत प. पू. परमानंद महाराज व पोलिस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या समवेत आत्मा मालिक ध्यानपीठ येथे गुरुपोर्णिमा उत्सवाचा नियोजन आढावा घेतला. यावेळी भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था आणि आपत्कालीन उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. पुणतांबा फाटा, श्री साईबाबा कॉर्नर या कोपरगाव शहरा लगत असणाऱ्या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे अनेकदा प्रकार उत्सव काळात घडतात त्यामुळे स्नेहलताताई कोल्हे यांनी याबद्दल आवश्यक ती सूचना केली आहे.

स्नेहलताताईंनी यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता जमाळे यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या की, नगर–मनमाड महामार्गावरील खराब रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करावी. विशेषतः पावसाळ्यात सिमेंटच्या रस्त्यांवर माती साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढते आहे, त्यावर त्वरित उपाय करावा, अशी सूचना त्यांनी केली. भाविकांची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गदर्शन केंद्रांची उभारणी, वाहनांच्या पार्किंगसाठी वेगळी जागा, आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

परमानंद महाराज यांनी सांगितले की, “गुरुपौर्णिमा हे आत्मा मालिक संप्रदायासाठी अत्यंत पवित्र पर्व आहे. भाविकांच्या सेवेसाठी आपले सेवेकरी कटिबद्ध आहेत. प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास भाविकांना उत्तम सोय व सुरक्षितता पुरविता येईल.

स्नेहलताताईंनी सांगितले की, गुरुपौर्णिमा हा श्रद्धेचा व शिस्तीचा संगम आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासन, सेवा संस्थांचे समन्वय महत्त्वाचे आहे. आपली जबाबदारी म्हणून मी स्वतः लक्ष ठेवून आहे. यामुळे गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन अधिक चोख आणि जनहितकारी होण्यास हातभार लागणार आहे.

Leave a Reply