कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना भेडसावत असलेल्या आयकरसंबंधी समस्या सोडवण्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवरा नगर येथे केली.

यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे व संचालक स्वाधीन गाडेकर उपस्थित होते. राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीविषयी यावेळी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रीय सहकार मंत्री मोहोळ म्हणाले, “स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कुटुंबीयांनी सहकार चळवळ सशक्त ठेवली असून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी केलेल्या शिफारशी पूर्ण करण्याचे वचन मी आज सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या प्रवरा नगरीत देतो.”

पतसंस्थांवर अन्यायकारक कर आकारणीचा मुद्दा मांडताना फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, “आयकर कायद्याच्या कलम 80P अंतर्गत सहकारी पतसंस्थांना कर सवलत असूनही त्यांच्यावर कर आकारला जातो. तसेच सहकारी बँकांतील गुंतवणुकीवर टीडीएसही आकारला जातो, जे चुकीचे आहे. जेव्हा कर लागू होत नाही, तेव्हा टीडीएसचा प्रश्नच उद्भवत नाही.”

या भूमिकेला केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आयकर कायद्याच्या कलम 269 एसओटी अंतर्गत दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यावर असलेल्या निर्बंधावरही पुनर्विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याशिवाय पतसंस्थांना सिबिल स्कोअरमध्ये समाविष्ट करणे, क्लिअरिंग हाऊसचे सभासदत्व व यूपीआय अॅक्सेस देण्यासंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन मोहोळ यांनी दिल्याचे काका कोयटे यांनी सांगितले.

ही भेट मा. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त झाली. ही भेट घडवून आणण्यात अहिल्यानगर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण बैठक घडून आणल्याबद्दल राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीने राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे व संचालक स्वाधीन गाडेकर यांनी त्यांचे आभार मानले.


