कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून नुकतेच पोहेगाव व जवळके ही गावे शिर्डी पोलिस स्टेशनऐवजी कोपरगाव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झाली आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील जनतेच्या अनेक अडचणी दूर होऊन त्यांना तातडीने पोलिस सेवांचा लाभ मिळणार आहे.

नेहमीप्रमाणे या कामासाठी देखील आमदार आशुतोष काळे यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष सुनील कदम यांनी आ.काळे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, कामाचा पाठपुरावा कोल्हे यांनी करायचा आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी काळे यांनी आयत्या पीठावर रेघोट्या मारायच्या हा प्रकार लोकशाहीला शोभणारा नाही.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ ते २०१९ कार्यकाळात स्नेहलताताई कोल्हे यांनीच कोपरगावात शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलिस स्टेशन मंजूर करून घेतले होते. तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनीही यासाठी सहकार्य केले होते.त्यानंतर वेळोवेळी नवनिर्मित शहर पोलिस स्टेशन, कर्मचारी निवास वसाहत तसेच आवश्यक निधी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिला.

प्रारंभी शहर पोलिस स्टेशनसाठी ३ कोटी ३२ लाख रुपये निधी मंजूर झाला. त्यानंतर युती सरकार आल्यावर ग्रामीण पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहतीसाठी तब्बल २८ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.काम कोल्हे यांनी केले आणि अनेक इमारतीचे उद्घाटन काळे यांनी कवडीचा संबंध नसताना केले होते हे संपूर्ण मतदारसंघाने पाहिलेले आहे.

तालुक्याच्या भौगोलिक विस्तारामुळे पोहेगाव व परिसरातील गावे शिर्डी पोलिस स्टेशनला जोडली गेली होती. मात्र नागरिकांचा दैनंदिन कामांसाठी देखील होणारा प्रचंड त्रास ओळखून स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे या गावांना पुन्हा कोपरगाव पोलिस स्टेशनला जोडावे अशी मागणी केली होती. त्याचा परिणाम म्हणून नुकत्याच गृहविभागाकडून मंजुरी कोल्हे यांच्या मागणीनुसार मिळाली आहे.

कोल्हे यांनी केलेल्या मागणीनुसार कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश गृहविभागाने दिलेले होते यामुळे काळे यांनी उगाच नको त्या कामाचे श्रेय घेऊ नये. हा निर्णय स्नेहलताताई कोल्हे यांच्या दूरदृष्टीचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आमदार काळे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका कदम यांनी केली आहे.
