कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील संवत्सर येथे ऋषीपंचमी निमित्त भाविकांचा महासागर उसळला. श्री शनी महाराज मंदिर प्रांगणात महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून महंतांचे आशीर्वाद घेतले व महिला भाविकांना शुभेच्छा दिल्या.

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांच्या अखंड परंपरेचे चिंतन ह.भ.प. विनायक महाराज वाघ यांनी कीर्तनातून सादर केले. मात्र, मीराबाई मिरीकर यांनी स्वतः भाविकांना शुभेच्छा देत आपला संदेश पोहोचवला. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी दोन्ही कीर्तनकारांचे संतपूजन केले.

प.पू. रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही किर्तन परंपरा आजही संवत्सर गावात अविरत सुरू आहे. दरवर्षी मीराबाई मिरीकर अखंडपणे आपली किर्तन सेवा देतात. संवत्सर या गावाला धार्मिक महत्त्व असून येथे शृंगऋषींचे भव्य मंदिर आहे. गोदाकाठावर महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर तर कोकमठाण परिसरात पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. या धार्मिक स्थळांमुळे संवत्सरचे वेगळे महत्व आहे.

ऋषीपंचमी हा महिलांच्या श्रद्धेचा दिवस असल्याने हजारो महिला भाविक गोदावरीत स्नान करून उपवास पाळतात व शनी मंदिर प्रांगणात किर्तनाचा लाभ घेतात. महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून स्वतः मीराबाई मिरीकर आश्चर्यचकित होतात आणि दरवर्षी उपस्थित राहून सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करतात. शेवटी, स्नेहलताताई कोल्हे यांनी महाप्रसाद वाटपाची सेवा केली व भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेतला.

या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब शेटे, संजीवनी सहकारी बँकेचे चेअरमन राजेश परजणे, भाजपा दिव्यांग सेल अध्यक्ष मुकुंद काळे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, अनिल भाकरे, गोविंद परजने, चिमाजी दैने, सचिन शेटे, प्रकाश बारहाते, अनिल शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. भाविक भक्त महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
