कोपरगाव मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

नवरात्र उत्सवात किरकोळ कारणावरुन झाला वाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : शहरातील मोहिनीराजनगर भागात दोन गटात बुधवारी राञी  किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. राजकीय वरदहस्त असलेल्या तालुक्यातील दोन्ही मातब्बर गटाशी संबंधीत असलेले कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. रस्त्यावर विटा, दगडांचा खच पडला होता. दगडा, विटा, लोखंडी रॉड, लाकडी दांडे आदिचा मोठया प्रमाणावर वापर यावेळी केला गेला.

पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. सदरची घटना रात्री पावणे अकरा ते बाराच्या सुमारास घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाले तर दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी अधिकची कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या. प्रत्येक गटातील २० व इतर अनोखळी १० ते १२ असा ६० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हाणामारीमुळे परिसरात घबराट व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्र उत्सवामुळे याच भागातून महिला व नागरिकांची जुनी गंगेकडे जाण्यासाठी मोठी वर्दळ असते. त्याच रस्त्यावर राडा झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अधिक माहिती अशी, या भागात नवरात्र निमित्त गरबाचा कार्यक्रम सुरु होता. त्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा धक्का लागण्याचे कारणावरून दोन्ही गट आमने सामने आले. त्यात फिल्मी स्टाईलने हाणामारी झाली.  उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. घटनेत दोन पोलीस कर्मचारीपैकी एकास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विवेक राजेंद्र आव्हाड रा निमगाव (राहाता) यांनी तर दुसरी फिर्याद सुनील योगेश गोर्डे  (रा. मोहिनीराजनगर) यांनी दाखल केली आहे.  दाखल फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध दगडफेक करणे, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे आदि कलमे लावण्यात आले आहेत.  घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन याविरुद्ध कठोर भूमिका घेणार का हे पाहावे लागणार आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देत घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले.  या भागात या पुर्वी ही दोन गटात अनेकवेळा मारामाऱ्या झाल्या असल्याने मोहनिराजनगर मधील सर्वसामान्य नागरीक दहशतीखाली राहत आहेत.

Leave a Reply