कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काका कोयटे यांनी कोणालाही विश्वासात न घेता अचानक रात्रीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या एकतर्फी निर्णयामुळे व्यापारी महासंघाची प्रतिमा व तटस्थता धोक्यात आली असून, या प्रकारास व्यापारी बांधवांचा स्पष्ट विरोध आहे.

एकीकडे व्यापारी महासंघाच्या नावाने कोल्हे व काळे परिवाराकडून मदत घेतली जाते आणि दुसरीकडे महासंघाचे नाव वापरून वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधला जातो, ही बाब कोणत्याही व्यापाऱ्यांना मान्य होण्यासारखी नाही. त्यामुळे व्यापारी महासंघात असंतोष वाढला असून संघटनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघ काका कोयटे यांच्या पाठीशी नसल्याची भूमिका महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तसेच बहुसंख्य सदस्यांनी संयुक्तपणे आपली भूमिका जाहीर करताना सांगितले की, व्यापारी महासंघ हा कोणाचाही राजकीय अड्डा नाही. व्यापाऱ्यांचे प्रश्न, व्यवसायवृद्धी, बाजारपेठेचा विकास आणि व्यापाऱ्यांचे हित जपणे हा महासंघाचा मूळ उद्देश आहे. अशा परिस्थितीत महासंघाचा वापर करून एकाकी व वैयक्तिक राजकीय भूमिका घेणे म्हणजे संपूर्ण तटस्थ व्यापारी वर्गावर राजकीय शिक्का मारण्यासारखे आहे, आणि हे कृत्य अत्यंत चुकीचे व निषेधार्ह असल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.

यापुढे व्यापारी महासंघ नावाचा वापर करून फायदा पाहणाऱ्या कोणत्याही फसवणुक करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक राजकीय भूमिकेला पाठिंबा देणार नसून, संघटना केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच कार्यरत राहील, तसेच अशा विश्वासघात करणाऱ्या प्रवृत्तीला आम्ही योग्य तो धडा ठरवू असा ठाम निर्णय महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. उपाध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल उपाध्यक्ष केशवराव भवर, बबलूशेठ वाणी, संतोष गंगवाल, सत्येन मुंदडा, महावीर दगडे आदींच्या वतीने ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.


