सुधन प्रीमियर लीग मध्ये लोकमंगल पतसंस्थेचा दणदणीत विजय

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित व सुधन गोल्ड लोन प्रस्तुत सुधन प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे पर्व दुसरे समता इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेतील अत्यंत चुरशीचा उपांत्य सामना सोलापूर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था आणि कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूल (टीचिंग स्टाफ) संघ यांच्यात खेळविण्यात आला.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधन गोल्ड लोनचे कार्यकारी विश्वस्त संदीप कोयटे यांनी केले.

अटीतटीच्या व रंगतदार सामन्यात सोलापूर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सामना आपल्या नावावर केला आणि सुधन प्रीमियर लीग २०२५ च्या विजेतेपदाचा मान पटकाविला. या सामन्यात लोकमंगल पतसंस्था संघाचे अरुण कोकाटे यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरी केल्याबद्दल स्वप्निल गहिंजे (लोकमंगल पतसंस्था) यांना प्लेअर ऑफ द सिरीज हा मानाचा किताब देण्यात आला.

स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था संघाच्या आशिष धवस यांना प्रदान करण्यात आला. त्याच संघाच्या अभिजीत घाडगे यांनी उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकाविला. तर उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार सुधन गोल्ड लोन क्रिकेट संघाच्या आसिफ शेख यांना देण्यात आला.

सुधन प्रीमियर लीग पर्व २ मध्ये नांदेड, यवतमाळ, मुंबई, धाराशिव, चंद्रपूर, सांगली, सोलापूर, वाई, नाशिक, कोपरगाव आणि काष्टी या विविध भागांतील २२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमुळे राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामातून विरंगुळा मिळत क्रिकेटमधील आपली गुणवत्ता सादर करण्याची संधी उपलब्ध झाली.

स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वी झाल्याबद्दल सहभागी संघांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून आस्वाद मेस विभागाच्या वतीने अन्नपूर्णा काकीजी यांनी दोन दिवसांच्या उत्कृष्ट भोजन व्यवस्थेमुळे खेळाडूंना आवश्यक ऊर्जा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याच ऊर्जेमुळे आम्ही विजेते ठरलो, अशी भावना लोकमंगल पतसंस्था संघाचे अजित कुऱ्हे, श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था संघाचे मिलिंद गोंडे आणि नेटविन सिस्टीम अँड सॉफ्टवेअर संघाचे हेमराज सावळे यांनी मनोगतातून व्यक्त केली. उपस्थितांचे आभार सुधन गोल्ड लोन संचालक स्वप्निल घन यांनी मानले.

Leave a Reply