नायलॉन मांजामुळे जीवितास धोका – नगराध्यक्ष संधान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : संक्रांती सण आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असला तरी नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागण्याची भीती व्यक्त होत आहे. नायलॉन मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर तो मानवी जीवन, पशुपक्षी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.

नगराध्यक्ष संधान म्हणाले की, नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक दुर्दैवी अपघात घडतात. दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्ष्यांचे गळे कापले जाण्याच्या घटना घडतात. काही वेळा या अपघातांत निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे अशा जीवघेण्या मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर होणार नाही यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून नायलॉन मांजाची विक्री होणार नाही यासाठी काळजी घ्यावी अशी मागणी नगराध्यक्ष पराग संधान यांनी केली.

तसेच त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, सण साजरा करताना आनंदाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे. आपल्या हातातील जीवघेण्या दोऱ्यामुळे कुणाचा जीव धोक्यात येऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. पर्यावरणपूरक दोरा वापरणे हाच सुरक्षित आणि कायदेशीर पर्याय आहे.संक्रांती हा सण आनंदाचा आहे, दु:खाचा नाही. त्यामुळे नायलॉन मांजासारख्या धोकादायक प्रकारांना थारा न देता सुरक्षित, पर्यावरणस्नेही पद्धतीने सण साजरा करूया, असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी शेवटी केले.

Leave a Reply