कर्मवीर शंकररावजी काळे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. ६ एप्रिल २०२६ : स्व.माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांची १०५ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांकडून कर्मवीर शंकरराव काळे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत समाजकारणात सक्रीय सहभागी असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले तर आभार उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी मानले. 

यावेळी प्रवीण भुसारे, विजयराव कुलकर्णी, छगनराव देवकर, तुकाराम जाधव, अॅड.शिरीष लोहकने, माणिक उगले, नितीन शिंदे, राजेंद्र मेहेरखांब, सुनील गाडे, भास्करराव आवारे, ज्ञानदेव मांजरे, जगन्नाथ देवकर, पाराजी गवळी, मोतीराम निकम, डॉ. इलियास सय्यद, विलास दवंगे, गणेश नागरे, शिवाजी ठाकरे, भाऊसाहेब कापसे आदी मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले की, कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्वतःची शिक्षण संस्था उभारली असती तर ती आज राज्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असती.

परंतु रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी व दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी स्वत:च्या शिक्षण संस्था उभ्या न करता रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी तनमनधनाने स्वत:ला वाहून घेतलं. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेले ज्ञानाचे रोपटे कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या  कष्टातून आणि निष्ठेने बहरले. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यानंतर माजी आमदार अशोकराव काळे यांनी हि परंपरा पुढे सुरु ठेवली व आजही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने काळे कुटुंबाची तिसरी पिढी रयत शिक्षण संस्थेची सेवा करीत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कार्य कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवणारे माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या आयुष्यात परिवर्तनाची पहाट आणली. सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्यामुळेच आज कोपरगाव तालुका राज्याच्या नकाशावर विकासाचे केंद्र म्हणून ओळखला जात आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करतांना  सामान्य माणूस आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवला होता. त्यांच्या कार्यात महत्त्वाचा कोसाका म्हणजेच कोपरगाव सहकारी साखर कारखाना मैलाचा दगड ठरला आहे. आजही कारखाना केवळ साखर उत्पादन करणारे केंद्र नसून परिसरातील हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन बनला आहे.

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या विचारांचा आदर्श घेवून आमदार आशुतोष काळे ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांचे हित जोपासून कारखान्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जात आहे. राजकारणातूनही जास्तीत जास्त समाजकारण कसे करता येईल आणि आपला कोपरगाव तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी आमदार आशुतोष काळे करीत असलेले प्रयत्न आणि पाठपुरावा यातून कर्मवीर शंकररावजी काळे यांनी प्रगत कोपरगाव तालुक्याचे पाहिलेले स्वप्न साकार होणार असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

याप्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की, काळे परिवाराच्या समाजकारणाचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी सांभाळत असतांना आपला कारखाना, स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब आणि काळे परिवारावर प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्त्यांचे वेळोवेळी मिळत असलेले प्रेम, सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. ज्याप्रमाणे कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपल्या सर्वाना समाजाच्या उद्धारची शिकवण दिली आहे त्या शिकवणीनुसार माझी वाटचाल सुरु असून या वाटचालीत सर्व कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या जयंती आणि पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहतात यावरून कार्यकर्त्यांचे साहेबांवर, काळे परिवारावर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहावर असलेल्या निस्सीम प्रेमाची अनुभूती येत असून आपले हे प्रेम काळे परिवारावर असेच ठेवून सदैव आपल्या ऋणात ठेवावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैतालीताई काळे, अॅड.प्रमोद जगताप, महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब कदम, भास्करराव आवारे, विश्वासराव आहेर, बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे आजी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच कारखान्याचे माजी संचालक सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, पदाधिकारी, सर्व खाते प्रमुख, कर्मचारी,सभासद, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.  

Leave a Reply