भेसळ नाही तर शुध्द रक्तच पाहीजे  – राधाकृष्ण विखे पाटील

 कोपरगाव येथील लायन्स समता ब्लड सेंचरचा दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी दि. १६ :  आता सर्वञ भेसळीची चर्चा जोरात आहे तेव्हा रक्त कोणाचेही चालत नाही  त्याची तपासणी होते. भेसळ रक्त चालत नाही रक्त शुद्ध पाहीजे, आपल्या रक्तदानामुळे दुसऱ्याचे आजार वाढू नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहीजे. ऐनवेळी रुग्णांना शुध्द  व अपेक्षित रक्त वेळेत न मिळाल्याने  धावपळ करावी लागते अनेकांचा जीव दगावतो माञ कोपरगावमध्ये समता चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब यांनी लायन्स समता ब्लड सेंटर उभं केल्याने याचा फायदा जिल्ह्याला होणार असल्याचे मत जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत  कोपरगाव शहरातील निवारा येथे लायन्स समता ब्लड सेंटरचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार विवेक कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, नगराध्यक्ष पराग संधान,  लायन्स क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी श्रेयस दिक्षित, राज मुच्छल, सम्राट वर्मा,  कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन भडकवाडे, संदीप कोयटे, इरफान पठाण, सुमित भट्टड, नगरसेवक  जनार्दन कदम, राजेंद्र जाधव, राजेश ठोळे, कैलास ठोळे, अरविंद भन्साळी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण निवारा परिसर तिरंग्याने सजवण्यात आला होता तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार  विवेक कोल्हे यांची तिरंगा रॅलिने  सभामंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.  यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात.

पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात भेसळीची चर्चा जोरात आहे.  सर्वाधिक दूधाची व इतर भेसळ करण्यात बीड व अहिल्यानगर जिल्हा आघाडीवर आहे. भेसळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतीमधील रासायनिक औषधांच्या अती वापराच्या परिणामामुळे ग्रामीण भागातील महीलांच्या कर्करोगामध्ये वाढ झाली आहे. विषमुक्त अन्न न खाल्ल्यामुळे मानवी शरीरावर त्याचा परिणाम होत असुन भावी पिढीवर सुध्दा त्याचा अधिक परिणाम होत आहे. तेव्हा निरोगी राहण्यासाठी रासायनिक ऐवजी नैसर्गिक शेतीकडे वळण्याची काळाची  गरज आहे. भेसळ दूध बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला भाव मिळत आहे. नागरीकांना शुध्द दूध मिळत आहेत. 

 निरोगी शरीर राहण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. शुध्द रक्त पुरवठा करणाऱ्या लायन्स समता ब्लड सेंटर सारख्या रक्तपेढीची गरज आहे.  रक्तदान करणे गरजेचे आहे हे योगा शिक्षक शहा यांनी  रक्तदान करुन सांगितले अशा शब्दात विखे यांनी कौतूक केले.  यावेळी आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, लायन्स क्लब व समता चॅरिटेबल ट्रस्टने काळाची गरज ओळखून हि रक्तपेढी सुरु केली हे कौतुकास्पद आहे.

 अन्नदान, ज्ञानदान, धन दान अनेक प्रकारचे दान असतात पण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. विज्ञान कितीही पुढे गेले तरीही एकाही शास्ञज्ञाला रक्त निर्माण करता आले नाही. माणसाने माणसाला रक्तदान करावे लागते मग रक्तदान करताना अथवा रक्त घेताना तिथे ते रक्त कोणत्या जाती धर्माचे आहे, कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहे किंवा  कोणत्या सेलिब्रिटींचे आहे हे पाहीले जात नाही. रक्ताचे अनेक प्रकार असतात काही रक्त संघर्षाचे असते, काही रक्त जिद्दीचे असते, वेगवेगळ्या प्रकारचे रक्त जरी असले तरी रक्तामध्ये इमानदारी असली पाहीजे.

रक्तामध्ये बेईमानी नको. युवकांमध्ये देशाभिमानाचे रक्त सळसळले पाहीजे. सध्या रक्तात सुध्दा भेसळ होत असल्याचे चिञ अनेक सदस्यानी विधानपरिषदेच्या सभागृहात मांडल्यामुळे रक्तात तरी भेळ होवू नये असे म्हणत  शाश्वत  रक्त पेढी म्हणून कोपरगाव येथे लायन्स समता ब्लड सेंटर निर्माण केल्याबद्दल आमदार कोल्हे  यांनी समता चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब कोपरगावचे भरभरुन कौतून केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात  संदीप कोयटे म्हणाले,  आम्ही दरवेळी रक्तदान करुनही,  गरज पडते तेव्हा वेळेवर रक्त मिळत नाही. रक्ताची कमतरता ओळखुन या  ब्लड सेंटरची सुरुवात केली.  कोयटे परिवारातर्फे ब्लड सेंटरला जागा मोफत देण्यात आली असुन येथे ४ हजार रक्तांच्या पिशव्या उपलब्ध  करण्यात आल्या आहेत. रक्ताशी निगडीत अनेक घटक उपलब्ध केले असुन रुग्णांना जाग्यावर रुग्णालयात रक्तच्या पिशव्या उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली आहे. गरीब , गरजू रुग्णांना दरमहीण्याला ५०  रक्ताच्या पिशव्या मोफत देणार आहोत तेव्हा रक्त दात्यांनी पुढे येवून रक्तदान करण्याची  गरज  आहे.

यावेळी  काका कोयटे  बोलताना म्हणाले, संदीप कोयटे यांच्यात रक्तदान करण्याचा उत्साह कायम असतो. कोपरगावचा लायन्स क्लब हा कोपरगावचा अभिमान आहे. माणुसकीच्या भावनेने आम्ही देवाच्या मंदीरापेक्षा माणुसकीचे अनेक मंदीरे उभे केले आहेत. विवेक कोल्हे आले म्हणजे माझे राजकीय गुरु साक्षात स्व. कोल्हे आलेत असे समजतो. राजकीय हेवेदावे व विरोध विसरून आता  हातात हात घालुन काम करुया असे म्हणत कोयटेंनी राजकीय विरोधाला पुर्ण विराम देण्याचा संकल्प मांडला.  या कार्यक्रमाला कोपरगावसह तालुक्यातील विविध क्षेञातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. 

Leave a Reply