कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी आजपर्यंत भरीव सहकार्य केलेले आहे. त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी अनेक विकासाची कामे झाली आहेत. यापुढील काळातही श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी कोल्हे परिवाराने असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांना संत श्री मुक्ताई यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (१४ मे २०२३) आयोजित सोहळ्यात कै. सौ. चंद्रभागाबाई राघोजी बुधवंत यांच्या नावाने देण्यात येणारा ‘मातोश्री’ पुरस्कार श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठ संस्थानचे प्रमुख प.पू. भास्करगिरीजी महाराज व श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्नेहलताताई कोल्हे यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त आयोजित श्री मुक्ताई समाधी सोहळ्यात प.पू. भास्करगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे यांनी प.पू. भास्करगिरीजी महाराज व प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच प.पू. भास्करगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे श्रवण करून भाविक-भक्तांसमवेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले; परंतु जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीने प.पू. भास्करगिरीजी महाराज व प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते मला मिळालेल्या ‘मातोश्री’ पुरस्काराचे मोल खूप मोठे आहे. प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी श्री मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ‘मातोश्री’ पुरस्कार सुरू केला आहे. तसेच त्यांचे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या स्मरणार्थ ‘गुरुकृपा’ पुरस्कार दिला जातो. मला त्यांच्या हस्ते मिळालेला ‘मातोश्री’ पुरस्कार म्हणजे लाखमोलाचे आशीर्वाद आहेत.
हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा व प्रेरणादायी असून, या पुरस्काराने आगामी काळात अधिक जोमाने समाजसेवा करण्याचे बळ व नवी ऊर्जा मला मिळाली आहे. पुणतांबा ही धार्मिक भूमी असून, येथे चांगदेव महाराजांची समाधी आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे आजारी असताना ते पुणतांबा येथे येत असत व श्री मुक्ताई ज्ञानपीठ आश्रमात येऊन प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या सान्निध्यात बराच वेळ घालवत असत.
स्व. शंकरराव कोल्हेसाहेब वयाच्या ९३ व्या वर्षी आजारपणातून बरे होऊन शेवटपर्यंत जनसेवेत सक्रिय राहिले. गेल्या काही दिवसांपासून स्वामी रामानंदगिरीजी महाराज आजारी आहेत. रामानंदगिरीजी महाराजांची प्रकृती लवकरच बरी होऊन ते पूर्वीप्रमाणे धार्मिक कार्यात सक्रिय होतील. प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी केलेल्या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत स्नेहलताताई कोल्हे यांनी श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे सर्व प्रश्न सोडविण्याची व धार्मिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच या ठिकाणी पुढील वर्षी होणाऱ्या धार्मिक सोहळ्यासाठी १ लाख रुपये मदत करण्याची घोषणा त्यांनी केली.
आजपर्यंत मी सामाजिक दायित्व स्वीकारून सामाजिक कार्य केले. समाजकारण, राजकारण करताना काहीवेळा टीका-टिपण्णी सहन करावी लागली; पण मी न घाबरता व निराश न होता समाजकार्य पुढे चालूच ठेवले. मी हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे पार पाडेन. श्री मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीने मला ‘मातोश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हा माझ्या जीवनातील फार महत्त्वाचा व भाग्याचा प्रसंग आहे. आई हीच आपली पहिली शिक्षिका असते.
आईकडून आपल्याला संस्काराची शिदोरी मिळत असते. जीवनात कितीही मोठे झालात तरी आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. आपण जीवनात कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसमोर लहानच असतो हा लाखमोलाचा संदेश आजच्या या पुरस्कार सोहळ्यातून दिला गेला आहे. माणसाच्या जीवनात गुरू व आईला खूप मोठे स्थान असते हे या पुरस्काराने अधोरेखित केले आहे, असे सांगून हा मानाचा ‘मातोश्री’ पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज व श्री मुक्ताई ज्ञानपीठ परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, संत, महंत हे समाज, तरुण पिढी, देशाचे भावी नागरिक घडविण्याचे काम करत आहेत. ‘मातोश्री’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्नेहलताताई कोल्हे आपल्या आई-वडिलांच्या आठवणी सांगताना भावूक झाल्याचे पहावयास मिळाले. आई-वडिलांचे संस्कार व शिकवण यामुळे आपल्याला जीवनात पुढे जाण्याचे सामर्थ्य मिळाले. माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळाले. माझे सासरे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व पती बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समाजकारण व राजकारण करताना नि:स्वार्थी भावनेने जनतेची सेवा केली. आजही ते काम करत आहे व यापुढेही हे काम प्रामाणिकपणे करेन.
स्वामी सहजानंद भारती, नारायणगिरीजी महाराज यांच्यासह अनेक संत, महंतांशी कोल्हे परिवाराचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले असून, यापुढील काळातही ते कायम राहतील. सामाजिक क्षेत्रात काम करण्यात खूप मोठे समाधान मिळते. राजकारणात येण्यापूर्वी मी महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे काम केले. महिला बचत गटाची चळवळ मजबूत करून महिलांच्या उन्नतीसाठी मला काम करता आले, त्याचे मला मोठे समाधान आहे, असेही स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या.
यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांच्या आई श्रीमती पुष्पलताताई कडू, बंधू रवींद्रभाऊ कडू, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रणित शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजयराव जाधव, भाऊसाहेब चौधरी, ह. भ. प. उत्तमराव महाराज, जगताप महाराज, शिंदे महाराज, महेश महाराज, मोरे महाराज, खताळ महाराज, योगेश महाराज, किरण महाराज, अशोक बोरबने, विजय धनवटे, सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव, संभाजी गमे, प्रतापराव वहाडणे, विक्रम वाघ, सुभाष वाघ, राजेंद लहारे, सागर येनगे, प्रमोद कोते, संजय वहाडणे, भाजप महिला मोर्चाच्या कोपरगाव तालुकाध्यक्षा वैशालीताई साळुंके,
शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, मंगलताई आढाव, शिल्पाताई रोहमारे, स्वातीताई आढाव, प्रतिभाताई साळुंके, म्हाळसाबाई महाजन, लताबाई महाजन, लताताई भोसले, मुक्ताबाई लोणारी, लताबाई रायते, निकिताताई चौधरी, स्वप्नालीताई चौधरी, सुरेखाताई भालेदार, माधुरीताई चौधरी, बेबीताई निर्मळ, रुपाताई जाधव आदींसह श्री मुक्ताई भक्त परिवार तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.