शाळेत उशिरा आल्याच्या कारणाने केला खुन
कोपरगाव प्रतिनिधी दि. ६ : कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलीला शाळेत उशिरा का आली म्हणुन एका शिक्षकाने मारल्याने त्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पण संबंधीत मुलीच्या खुनाचा गुन्हा नोंद होण्यासाठी मुलीच्या पालकांना तब्बल आठ वर्षे संघर्ष करावा लागला.
शिक्षकाने आपल्या मुलीला धक्का दिला त्यात ती खाली पडल्याने डोक्याला मार लागला. उपचारा दरम्यान मुलगी मयत झाली. अशा आशयाची तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने तब्बल आठ वर्षानंतर शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील दिगंबर हांडे (४२) रा .कोपरगाव या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एक एप्रिल 2018 रोजी मयत विद्यार्थिनींची आई उमा दीपक भोसले यांनी न्यायलयात फिर्याद दिली होती. फिर्यादीची मुलगी तृप्ती दीपक भोसले (९) ही पढेगाव येथील चारी नंबर 45 जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकत होती.
शाळेमध्ये येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून सदर शिक्षकाने मुलीला धक्का दिल्याने ती खाली पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. दरम्यान मुलीला उपचारासाठी सुरुवातीला शिर्डी येथील रुग्णालयात त्यानंतर लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारा दरम्यान सदर मुलगी मयत झाली होती. फिर्यादी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी कोपरगाव न्यायालयांमध्ये अर्ज दाखल केला होती. सदर अर्जानुसार न्यायालयाने शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी हे करत आहे. शिक्षकांनी विद्यार्थिनीला शिक्षा दिल्याची घटना चांगलीच अंगलट आल्याचे या प्रकारावरून दिसून आले आहे.
शिक्षका विरूध्द गुन्हा दाखल करण्यासाठी मयत मुलीच्या पालकांनी कोपरगाव तहसील कार्यालया समोर अनेक दिवस आमरण उपोषण करुन प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.