शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : शेवगाव तालुक्याला प्राचिन शिवालयाचा वारसा लाभला आहे. पहिल्याच श्रावणी सोमवाराचे निमित्ताने तालुक्यातील या सर्व शिवालयात हजारो भाविकांनी मनोभावे शंभू महादेवाचे दर्शनाची पर्वणी साधली. ठिकठिकाणच्या शिवालयात पहाटे पासूनच दर्शनाला रांगा लावल्या होत्या. यावेळी असंख्य भाविकांनी मोठ्या भक्ती भावे शिवाला आवश्यक प्रमाणात पाऊस पाडण्याचे साकडे घातले.
तालुक्यातील गोळेगावचे श्री काशी केदारेश्वर महादेव रामायण कालीन आहे. तर क्षेत्र घोटण येथे पांडवकालीन श्री मल्लिकार्जूनेश्वर महादेव देवस्थान आहे. तसेच धाकटे शिखर शिंगणापूर म्हणून लौकिक असलेले माळेगावचे ऐतिहासिक महादेव देवस्थान देखील शेवगाव जवळच आहे. श्रावणात या देवस्थानात रोजच यात्रोत्सव असतो. याशिवाय दहिगावने येथील दधनेश्वर, गुंफ्याचे काळेश्वर, शेवगाव खालची वेस परिसरात असलेल्या छत्रीच्या महादेव मंदिरासह गावोगावी असलेल्या महादेव देवस्थानात भाविकांनी सोमवारच्या दर्शनाची पर्वणी साधली.
माळेगावला श्रावणाचा शुभारंभ व देवस्थानचे संस्थापक काळोजी बाबाच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तेथेही दिवसभर भाविकांची रीघ होती. घोरणला आज यात्राच भरली. येथे नवस फेडण्याची परंपरा असल्याने पंचक्रोशीतील बाहेरगावी दिलेल्या मुली, नोकरी व्यवसाया निमित्ताने गेलेले ग्रामस्थ श्रावणात रजा काढून येथेच मुक्काम ठोकतात. गर्दीचा अंदाज असल्याने शेवगावचे भाविक प्रितम गर्ज पहाटे पाचला आपल्या मातोश्री व छोट्या मुलीसह दर्शन बारीला लागले तरीही त्यांचे अडीच तासाने मल्लिकार्जूनेश्वराचे दर्शन झाले.