शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील पर्यवेक्षक उमेश घेवरीकर यांना महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी आज शुक्रवारी आपल्या सहकाऱ्या समवेत शेवगावी विद्यालयात समक्ष येऊन त्यांचा तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन सत्यवान थोरे यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी तांबे म्हणाले, काँग्रेसचे त्या काळातील एकनिष्ठ कार्यकर्ते गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे यांनी शिक्षणाचा पवित्र वसा अंगीकारला व तो पुढच्या पिढीला देताना शैक्षणिक गुणवत्ते सोबत संस्कारक्षम आचारसंहितेचा आग्रह धरला आणि हेच विचार पुढे नेण्याचे कार्य भारदे साक्षरता प्रसारक मंडळमार्फत होत आहे. मागील काळात जो आदर्श ज्येष्ठ गुरुजनांनी आपल्यासमोर ठेवला त्याचे अनुकरण नवीन पिढीने करावे.
संस्थेचे सचिव शामकाका भारदे, माजी नगरसेवक महेश फलके, सागर फडके, मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, प्राचार्य शिवदास सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक गोकुळ घनवट, सदाशिव काटेकर आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल फडके, निरीक्षक अभिजीत लुणिया, शिक्षक संघटनेचे नेते अशोक, समीर काझी, सुधीर बाबर, समद काझी, धनंजय डहाळे, बब्रू वडघणे यांनी आमदार तांबे यांचा सत्कार केला.