गणेशमुर्ती विक्रीतुन कोपरगाव मध्ये कोटींची उलाढाल

 भक्तीभावाने झाले बाप्पाचे स्वागत

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव तालुक्यात यावर्षी अपेक्षित पाणी पाऊस होत असल्याने नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशातच गणरायाचे आगमन झाल्याने सर्वांनी भक्तीभावाने गणरायांचे स्वागत करीत बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

 कोपरगाव शहरात अंदाजे ४० पेक्षा अधिक गणेश मुर्ती विक्रेते दुकाने थाटली होती. सरासरी १० हजारांपेक्षा अधिक गणेश मुर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यातुन एका एका दुकानातून दोन ते आडीज लाखांची आर्थिक उलाढाल झाली. तर संपूर्ण कोपरगाव मधुन गणेश मुर्ती  विक्रीतुन कोटींची उलाढाल झाल्याने कोपरगावच्या बाजारपेठेला बळकटी मिळाली आहे. 

 कोपरगावमध्ये  १ फुटा पासुन ते १५ फुटांपर्यंत गणेश मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यामुळे शेजारच्या तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी कोपरगावच्या  गणेश मुर्तींचा अधिक पसंती दिली आहे.  कोपरगाव नगरपालीकेच्यावतीने शहरातील  तहसील मैदानावर गणेशमुर्तींच्या विक्रीसाठी खास स्टाॅलची व्यवस्था करण्यात आल्याने मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी झाली. 

 गणेशमुर्ती खरेदीसाठी चार दिवसांपासून गणेश भक्तांची लगबग सुरु होती. काही गणेशमुर्ती विक्रेते रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी रस्त्यावर स्टाॅल लावून गणेश भक्तांसह अनेकांची अडचण केली. रस्त्यावर दुकाने थाटल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पालीकेचे काही कर्मचारी रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्याकडे जाणुनबुजून कानाडोळा करीत होते. तर तहसील मैदानावर लावलेल्या स्टाॅलच्या समोरच काही विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने गणेश मुर्त्या  घेण्यासाठी येणाऱ्यांची कुचंबणा होत होती. 

नगरपालीकेने एका स्टाॅलचे  तेराशे ते हजार रुपये चार दिवसांसाठी पैसे घेतले आणि पैसे भरुन स्टाॅल लावलेल्यांच्या समोर रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्यांकडे डोळेझाक करीत होते यामुळे एकाच ठिकाणी गर्दी झाली. रस्त्यावर दुकाने थाटल्याने शहरातील बाजारपेठेत जाण्यासाठी नागरीकांना कसरत करावी लागली. अनेक गणेश भक्तांनी गर्दीतून वाट काढीत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेवुन जात होते. आनंदने नाचत गणपतीचा गजर करीत ढोलताशांच्या तालावर नाचत गणरायाची प्रतिष्ठापना कोपरगावकरांनी  केली.