राहाता प्रतिनिधी, दि. २१ : येथील साईयोग फाउंडेशने स्वच्छतेचे दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिप्रेत असलेले स्वच्छता अभियान राबवून राहाता नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी व प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसर स्वच्छ झाडून घेण्यात आला.
साई योग फाउंडेशने महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी वृक्षारोपण अथवा स्वच्छ्ता अभियान राबवून साजऱ्या केल्या जातात. साईयोग फाऊंडेशनचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करत सूत्रसंचालन केले. यावेळी ॲड. दत्तात्रय धनवटे म्हणाले, गाडगे महाराजांनी ग्राम स्वच्छते बरोबरच मनातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य केले आहे. त्यांचेअनुकरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
रामभाऊ लोंढे यांनी मनोगत व्यक्त करतांना गाडगे महाराजांचे स्वच्छतेचे महान कार्य साईयोग फाउंडेशन पुढे नेत असल्याचे नमूद करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.प्राथमिक शिक्षक प्रविण खांडिझोड यांनी गाडगेमहाराजांचा जीवनपट व कार्य उलगडून सांगताना अक्षरशः शरीरावर रोमांच उठत होते. ते पुढे म्हणाले, गाडगे महाराज अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किर्तनाद्वारे करत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या समवेतचे प्रसंग ऐकताना सर्वजण भारावून गेलेत. तसेच साईयोग फाउंडेशनने सुरू केलेले गाडगे महाराजांचे स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य यापुढेही अधिक जोमाने चालू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, दिपक दंडवते, मोहन तांबे, अनिल सातव, ॲड. गोरखनाथ दंडवते, संजय बाबर, संजय वाघमारे, बबलू फटांगरे, रविंद्र धस, बाळासाहेब तारगे, व्यंकटेश अहिरे,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,सिताराम बावके,सुभाष दंडवते,शिवाजी पोटे, प्रभाकर नावकर, संजय गोयर, योगेश वैराळ, रवी निकाळे, सचिन अंबडकर, प्रसाद लांडगे, मंगल निकाळे, सुनीता निकाळे, ज्योती खंदारे, मीना माळी आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगे महाराजांच्या भजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.