भाजप पक्षाच्या महाअधिवेशनाकडे राजकीय पक्षाच्या नजरा

भाजप अधिवेशनामुळे शिर्डीला पोलीस छावणीचे स्वरूप

शिर्डी प्रतिनिधी, दि. ११ : १२ जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजप पक्षाच्या महाअधिवेशनात काय घोषणा होतात यांकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा गटाबरोबरच इतर राजकीय नेते तसेच पक्षाच्या नजरा लागल्या असून आज रविवारी शिर्डीत होणाऱ्या या भव्य दिव्य अधिवेशनानिमित्त शिर्डी शहर भाजपमय झाले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील दिग्गज नेते तसेच मंत्री व आमदार आज अधिवेशनानिमित्त शिर्डीत दाखल होणार असल्याने शिर्डीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. भाजपचे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी स्वीकारली असल्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यासाठी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. 

  साईंच्या शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन शिर्डीत होत असल्याने या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातील भाजपचे मंत्री, आमदार यांनी शनिवार पासूनच शिर्डीत अधिवेशनासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारी १२ जानेवारी रोजी होणाऱ्या या अधिवेशनासाठी १५ हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमून या ठिकाणी विचारांचे मंथन करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद  व  इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे या अधिवेशनात याबाबत काय घोषणा होतात याकडे निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने १५० जागेंवर आपले वर्चस्व सिद्ध करत एक नंबरचा पक्ष होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप पक्षांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करावे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी या महाअधिवेशनाचे आयोजन केले असल्याचे समजते. अधिवेशनानमित्त पक्ष संघटनात्मक बांधणी हा मुद्दा देखील भाजप पक्षाने अधिवेशनानमित्त हाताळला आहे. 

  १२ जानेवारी शिर्डी येथे होत असलेल्या भाजप महाअधिवेशनात देश पातळीवर भाजप पक्षाचे शक्ती प्रदर्शन दिसावे या अनुषंगाने देखील या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने देखील या ठिकाणी दोन वेळेस अधिवेशन घेतले होते. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी विमान, रेल्वे व बस सेवा उपलब्ध असून  राहण्यासाठी संस्थांचे भक्तनिवस व भोजन करण्यासाठी प्रसादलाय उपलब्ध असल्यामुळे शिर्डीत हजारो नागरिकांची या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था होऊ शकते या अनुषंगाने या ठिकाणी मोठे एक्सपो व अधिवेशन सातत्याने होतात 

. शनिवारी सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री  बावनकुळे तसेच राज्यातील भाजप पक्षाचे मंत्री व आमदार यांची पंचतारांकित हॉटेल येथे कोर कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्यातील भाजपचे प्रमुख नेते मंत्री व आमदार यांच्या उपस्थितीत आज रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी शिर्डीत या अधिवेशनाचे पहिले सत्र सुरू होणार असून दुपारच्या सत्रात भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहून या अधिवेशनात उपस्थित असलेल्यांना  मार्गदर्शन करणार आहेत. ते उपस्थितांना काय मार्गदर्शन करणार पक्षाची रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला मिळालेले मोठे यश त्यानंतर लगेचच रविवारी शिर्डीत भाजपचे अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे . रविवारी शिर्डी होणाऱ्या अधिवेशनासाठी नेत्यांच्या सुरक्षेसाठी शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून भाजप पक्षांच्या नेत्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत बॅनर्स तसेच झेंडे व पताका लावण्यात आल्याने शिर्डी शहर भाजपमय झाल्याचे दिसून आले असून या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत काय घोषणा होती याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना लागली आहे.