कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : शहरालगत नगर-मनमाड महामार्गावरील नव्याने बांधलेला पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असूनही किरकोळ कारणांमुळे तो अद्याप लोकसेवेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव व शिर्डी येथे भाविकांची आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असल्याने या पूलावरील वाहतूक सुरू करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा या भागात वाहनकोंडी होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा कोपरगाव शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तत्काळ पूल वाहतुकीसाठी खुला केला नाही, तर सामान्य जनतेच्या हातून हा पूल खुला केला जाईल.

साठे यांनी पुढे सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत आहेत. शासकीय नियमित कामांचे श्रेय घेण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अक्षम्य आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले असून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सण उत्सवात नागरिकांना वेठीस धरून त्रास होऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.


