जुना टाकळी रोड टाऊन प्लॅन नुसार खुला करा, अन्यथा २७ जानेवारीला उपोषण – विजय जाधव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोड नाका येथील एम.डी.आर-९९ क्रमांकाचा रस्ता अतिक्रमणमुक्त करून दर्जेदार रस्ता न केल्यास बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी (सार्वजनिक बांधकाम विभाग),कोपरगाव यांना लेखी निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात जाधव यांनी नमूद केले आहे की, सर्वे नं.२०४ मधून गेलेला एम.डी.आर-९९ हा रस्ता जुना टाकळी रोड नाका ते नक्षत्र मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्के व कच्चे बेकायदेशीर अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

सदरचा रस्ता हा भारत गॅस पर्यंत 18 मीटरचा असून भारत गॅस पासून पुढील रस्ता हा 30 मीटरचा डी पी प्लॅन नुसार असल्याने सदरचा रस्ता हा नगरपरिषदेने डी पी प्लॅन नुसार मंजूर केला. मात्र हा रस्ता नगरपरिषदेच्या ताब्यात आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हे अजून पर्यंत स्पष्ट न झाल्यामुळे याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी अहिल्यानगर तसेच जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग नगर रचना विभाग व प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत.

अद्याप पर्यंत कुठलेही दखल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसून मागील दहा वर्षापासून सदर घटनेचा पाठपुरावा करत असून अद्याप पर्यंत न्याय न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी २७ जानेवारी २०२६ रोजी कोपरगाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याची तयारी सुरू केली आहे.

याबाबत संबंधित विभागाने ही जबाबदारी स्वीकारून सदर रस्त्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा २७ जानेवारी रोजी होणारी उपोषणास सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला नगरपरिषद जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी जबाबदार राहतील असे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी म्हटले आहे.

Leave a Reply