कोपरगाव प्रतीनिधी, दि. 29 : कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील विजेच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०२६-२७ अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वस्त्या आणि नवीन गावठाण गुरुकुल विकसित करण्यासाठी लाभार्थ्यांना दिलेल्या जागेत रोहित्र बसवण्यासाठी ६५ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदारसंघातील अनेक आदिवासी बांधवांना वीज जोडणीस येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी महावितरण आणि जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यातून कोळगाव थडी येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ११ लाख २ हजार,

कुंभारी येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ८ लाख ३६ हजार, कारवाडी येथील आदिवासी वस्तीमध्ये ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ६ लाख ४३ हजार, मुर्शतपूर येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ६ लाख ३६ हजार,चांदगव्हाण येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ५ लाख ९७ हजार

तर संवत्सर येथे नवीन गावठाण गुरुकुल विकसित करण्यासाठी रामवाडी येथे १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व एबी केबल टाकण्याच्या कामासाठी १५ लाख ७३ हजार व दशरथ वाडी येथे ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मर व एबी केबल टाकण्याच्या कामासाठी ११ लाख ८३ हजार अशा एकूण ६५.७१ लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आभार मानले आहे.

आदिवासी वाड्या- वस्त्यांवरील विज रोहीत्रांसाठी निधी मंजूर झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पासरले असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.


