चोरट्यांच्या मारहाणीत दोघांचा जागीच मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : शेवगावचे आडत व्यापारी दगडूशेठ उर्फ गोपीकिसन  गंगाभिसन बलदवा यांचे  मारवाडी गल्लीतील राहत्या घरी अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने  शुक्रवारी (दि २३ ) पहाटे तीन – चार वाजण्याच्या दरम्यान घरफोडी केली. यावेळी चोरट्याने केलेल्या जबरदस्त मारहाणीत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जबर जखमी झाली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

   पुष्पा हरीकिसन बलदवा (वय ६०) व दगडूशेठ उर्फ  गोपीकिसन गंगाभिसन बलदवा ( वय ५०) असे मृत दीर भावजयीची नावे असून सुनीता गोपीकिसन बलदवा ( वय ४८) ह्या जबर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी,  पोलीस निरीक्षक विलास पुजारी फौज फाट्या सह घटनास्थळी दाखल झाले. थोड्याच वेळेत श्वान पथक, ठसे तज्ञ, फॉरेन्सीक लॅब युनिट व्हॅन, स्थानिक गुन्हे शाखेचे  पथक देखील येथे  दाखल झाले

चोरट्यांच्या मारहाणीत आडत व्यापारी  बलदवा व त्यांच्या भवजायीचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच व्यापारी व नागरिकांनी  त्यांच्या घराच्या परिसरात गर्दी केली. त्यानंतर घटनेचा निषेध म्हणून  व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार, दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.

    जखमी सुनीता बलदवा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या घटनेबाबत अधिक माहिती देताना, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, या घटनेच्या प्राथमिक तपासात केलेली चौकशी तसेच उपलब्ध झालेल्या सीसीटिव्ही फुटेज मध्ये एका अज्ञात चोरट्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. असे असले तरीही इतर साथीदार होते का.? याचा तपास पोलीस घेत आहेत.

          या घटनेत हत्यार म्हणून वापरलेली लोखंडी टॉमी व कटवणी तेथे सापडली असून सुमारे ४ लाख ९५ हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरीला गेल्याचे राकेश ओला यांनी यावेळी सागितले. चोरी गेलेल्या ऐवजामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करताना काही धागेदोरे हाती लागल्याचे, त्यांनी माध्यमांशी बोलतांना सुचित केले आहे.

        घटनेची माहिती मिळताच, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी येथे येऊन घटनस्थळाला भेट दिली.  बलदवा कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांनतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची शेवगाव पोलीस ठाण्यात भेट घेत चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी केली. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते अरुण  पाटील लांडे होते.  तसेच माहेश्वरी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक  ओला यांची भेट घेऊन या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून संबंधित चोरट्यांना अटक करावी अशी मागणी केली.

    तपासाची चक्रे वेगाने फिरवत, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, गणेश वारुळे आदी शहरात ठाण मांडून होते.

      बलदवा यांचे एका नातेवाईकाने तीर्थयात्रेला जाताना मयत गोपीकिसन यांच्याकडे त्यांचा काही सोन्याचा ऐवज ठेवला होता. तो ही चोरीला गेला. ते नातेवाईक तीर्थयात्रेतून मागे फिरले असून ते आल्यानंतरच चोरी गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा समजू शकेल अशी तसेच या माहिती मुळेच चोरी झाली असावी. अशी येथे दबक्या आवाजात चर्चा होत होती.