कोपरगाव प्रारतिनिधी, दि. २२ : राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कारखान्याच्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची जपणूक होण्याच्या दृष्टीने कारखाना कार्यस्थळावरील सर्व कागदपत्रे, स्थावर व जंगम मालमत्तेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा व व्हिडीओ चित्रीकरण करून ती संपूर्ण कागदपत्रे व मालमत्ता नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी. तसेच गणेश कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत कुठलाही बेकायदेशीर करार करू नये, अशी मागणी श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आज प्रत्यक्ष भेटून केली.
गणेशनगर (ता. राहाता) येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक १७ जून २०२३ रोजी पार पडली. १९ जून २०२३ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश परिवर्तन मंडळाने एकूण १९ पैकी १८ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. ऐतिहासिक ठरलेल्या या निवडणुकीत गणेश कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवून कोल्हे-थोरात युतीच्या श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या ताब्यात एकहाती सत्ता दिली आहे.
गणेश साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांनी बुधवारी (२१ जून) पुणे येथे साखर आयुक्तालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हे निवेदन देताना गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, विजय दंडवते, संपत हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, अरविंद फोपसे आदी उपस्थित होते.
या निवेदनात या नवनिर्वाचित संचालकांनी म्हटले आहे की, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नवीन संचालक मंडळाची निवडही झालेली आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखाना यापूर्वी आठ वर्षांसाठी करारान्वये चालविण्यास दिलेला होता. यापुढे कारखाना चालविण्यास देण्याबाबत कुठलाही बेकायदेशीर करार करू नये. श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू असताना कारखान्यामध्ये असलेले कागदपत्र, ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याला लागणाऱ्या सर्व मशिनरी, उत्पादित झालेली साखर व इतर उपपदार्थ तसेच कारखान्याच्या मालकीची इतर सर्व साधनसामग्री सुस्थितीत असणे आवश्यक आहे.
मात्र, मधल्या काळात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याची शक्यता आहे. सभासदांचे हित व कारखान्याची मालमत्ता सुस्थितीत व सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यमुळे नवनिर्वाचित संचालक मंडळास कारखाना ताब्यात घेतेवेळी कारखाना परिसरात असणाऱ्या सर्व साधनसामग्रीचा लेखा-जोखा जपवणूक होण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व्हिडीओ शूटिंग करण्यात येऊन कारखाना कार्यस्थळावरील स्थावर व जंगम मालमत्तेचा पंचनामा करण्यात यावा.
कारखान्याच्या सर्व मालमत्तेचा रीतसर पंचनामा करून ही मालमत्ता साखर आयुक्त, साखर आयुक्तालय, पुणे, जिल्हाधिकारी, अहमदनगर, जिल्हा पोलिस अधीक्षक, अहमदनगर, विभागीय सहनिबंधक (आरजेडी), अहमदनगर स्वतः अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत कारखाना नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे नवनिर्वाचित संचालकांनी या निवेदनात शेवटी म्हटले आहे.