गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या पालखीचे बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते पूजन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : जगातील एकमेव असलेल्या कोपरगाव येथील बेट भागातील गुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव आज अभिषेक, पूजा, महाआरती आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री उत्सवानिमित श्री शुक्राचार्य महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. परंपरेनुसार यंदाही गोदावरी नदीकाठी श्री गुरू शुक्राचार्य महाराजांची पालखी आणि गंगा भेटीचा सोहळा पार पडला. या मानाच्या पालखीचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

याप्रसंगी श्री शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, विलासअप्पा आव्हाड, दादासाहेब नाईकवाडे, नरेंद्र आव्हाड, बाळासाहेब रोहम, आदिनाथ ढाकणे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, भीमा संवत्सरकर, जयप्रकाश आव्हाड, किरण सुपेकर, विलास आव्हाड, सचिन सावंत, मुन्ना आव्हाड, विशाल आव्हाड, सुनील पांडे, अभिषेक आव्हाड, वैभव गीते, विकास शर्मा, अनिकेत पानगव्हाणे, समीर सुपेकर, राज परदेशी, विनु कांगणे, रामचरण आव्हाड, आनंद आव्हाड, कचरू लोहकरे, अतुल शिंदे, सागर नाईकवाडे, सदाशिव मैले आदींसह भाविक-भक्त  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहराजवळील बेट भागाला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. प्राचीन काळापासून हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीरामचंद्र याच परिसरातून वनवासाला गेले, असे मानले जाते. कोपरगाव बेट हे भृगू ऋषींचे पुत्र गुरू शुक्राचार्य ऊर्फ भार्गव यांची कर्मभूमी आहे.

गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर बेट भागात धार्मिकदृष्ट्या महत्त्व असणारे दानवांचे गुरु व संजीवनी मंत्राचे निर्माते ऋषी शुक्राचार्य मंदिर, देव पुरुष कचेश्वर मंदिर, त्र्यंबकराज मंदिर आहे. दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे जगातील एकमेव मंदिर कोपरगाव येथील बेट भागात असून, प्रतित्र्यंबकेश्वर म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. त्यामुळे येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. गुरू शुक्राचार्य मंदिरात मुहूर्त, वेळ व नक्षत्र न पाहता बाराही महिने विवाह सोहळे होतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित येथे मोठा उत्सव असतो.

यंदा महाशिवरात्री उत्सवानिमित्त शनिवारी (१८ फेब्रुवारी) श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये अभिषेक, पूजा, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. पहाटे ५ वाजता गुरू श्री शुक्राचार्य यांची पंचामृत महापूजा, सकाळी ७ वाजता गुरू श्री शुक्राचार्य यांचा मुखवटा स्थापन व गंगापूजनाचा कार्यक्रम झाला. श्री शुक्राचार्य यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दिवसभर प्रचंड गर्दी केली होती.

दिवसभर सामुदायिक अभिषेक, पूजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता मध्यान्ह महाआरती झाली. सायंकाळी श्री शुक्राचार्य महाराजांच्या पालखी (छबिना) ची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ही ‘श्रीं’ ची मानाची पालखी गोदावरीतिरी गंगाभेटीसाठी आली असता, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते ‘श्रीं’ च्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. बिपीनदादा कोल्हे यांनी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित गुरू श्री शुक्राचार्य यांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि महाशिवरात्री उत्सवानिमित सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.