कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : जलसंपदा विभागाकडून गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत नमुना नंबर ७ मागणी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना २५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी आपला पाणी मागणी हक्क ७ नंबर अर्ज जास्तीत जास्त संख्येने भरावे. ज्यामुळे आपल्याला मिळणारे पाणी हे कमी होणार नाही व त्यावरचा आपला हक्क अबाधित राहील.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी यासंदर्भात नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव येथील गोदावरी डावा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता आणि राहाता येथील गोदावरी उजवा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले असून, त्यात ही मागणी केली आहे. स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव व राहाता हे अवर्षणप्रवण तालुके असून, या दोन्ही तालुक्यांना दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होतो.
गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरच या भागातील शेतकरी पिके घेतात. यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या जेमतेम पावसावर कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिकांची लागवड केली आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके करपून गेली आहेत.
खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण मदार गोदावरी कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावरच आहे.
जलसंपदा विभागाने गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगाम २०२३- २४ मधील सिंचनासाठी नमुना नं. ७ द्वारे पाणी मागणी करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागविले आहेत. सध्या गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या नियोजनाची कामे सुरू आहेत.
अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झालेले नाही. मागील दोन महिन्यांपासून कोपरगाव व राहाता तालुक्यात पावसाने ओढ दिलेली आहे. सद्य:स्थितीत शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. सिंचनासाठी नमुना नं. ७ द्वारे पाण्याची मागणी करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत; पण अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या नियोजनात अडकल्याने अद्याप पाणी मागणी अर्ज सादर करू शकले नाहीत.
आपण गोदावरी कालवा लाभधारक शेतकऱ्यांना नमुना नं. ७ पाणी मागणी अर्ज सादर करण्यास दिलेली १५ ऑगस्ट २०२३ अखेरची मुदत २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढवून देण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांना नमुना नं. ७ पाणी मागणी अर्ज मुदतीत सादर करता येईल व जास्तीत जास्त क्षेत्रास सिंचनासाठी पाणी मिळेल. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांना नमुना नं. ७ पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याबाबत संबंधितांना तात्काळ योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.