शांताबाई लोंढे कोपरगावकर यांच्या मदतीला धावल्या स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : एकेकाळी आपल्या सौंदर्याने व नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पाडून तमाशाचा रंगमंच गाजविणाऱ्या लावणीसम्राज्ञी शांताबाई अर्जुन लोंढे कोपरगावकर या विपन्नावस्थेत अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे समजताच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे त्यांच्या मदतीला धावून गेल्या. स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वत: पुढाकार घेत शांताबाई लोंढे यांना साडी-चोळी व आर्थिक स्वरुपात मदत करत शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घडवले.

तसेच पुढील आरोग्य उपचार व्यवस्था करून द्वारका माई वृध्दाश्रम येथे शांताबाई यांच्या सध्या राहण्याची व्यवस्था करून त्यांना मायेचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. शांताबाई लोंढे यांना व त्यांच्यासारख्या वयोवृद्ध कलावंतांना सरकारच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. मी आज म्हातारी झाले असले तरी माझी कला म्हातारी झालेली नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया शांताबाई लोंढे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

लावणीसम्राज्ञी शांताबाई अर्जुन लोंढे ऊर्फ शांताबाई कोपरगावकर यांनी ३०-४० वर्षांपूर्वी आपल्या पहाडी आवाजाने व नृत्य कलेने रसिकांना मोहिनी घातली होती. सौंदर्य, आवाज, नृत्य या तीन गोष्टींवर त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी रसूल पिंजारी वडीतकर, भिका-भीमा सांगवीकर, धोंडू कोंडू सिंधीकर, हरिभाऊ अन्वीकर, शंकरराव कोचुरे खिर्डीकर अशा खानदेशातील नामवंत तमाशा फडात काम केलेले आहे. त्यांनी सुंदर नृत्य व गायन करून आपल्या लाजवाब अदाकारीने उत्तर महाराष्ट्र, खानदेशातील अनेक तमाशा फड व मुंबईतील लालबाग परळचे हनुमान थिएटरही गाजवले होते.

एकेकाळी वैभवात राहणारी ही लावणीसम्राज्ञी गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर भीक मागून अत्यंत बिकट अवस्थेत जगत होती. शांताबाई लोंढे कोपरगावकर यांना हक्काचा निवारा नव्हता. कोपरगाव येथील बसस्थानक हेच त्यांचे घर झाले होते. तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर या ७५ वर्षांच्या असून, त्यांचा लावणी गात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि शांताबाईंचे वास्तव जीवन जगासमोर आले. वयोवृद्ध कलावंत शांताबाई कोपरगावकर या अतिशय हलाखीचे आयुष्य जगत असल्याची माहिती माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांना मिळताच त्यांचे मन हेलावले. स्नेहलताताई कोल्हे यांनी शनिवारी (२४ जून) शांताबाई लोंढे कोपरगावकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. शांताबाई लोंढे यांचे उतारवयात होत असलेले हाल पाहून व त्यांची व्यथा ऐकून एक कलाप्रेमी म्हणून स्नेहलताताई कोल्हे यांना खूप वाईट वाटले. त्यांनी शांताबाई लोंढे यांना साडी-चोळी घेऊन दिली व आर्थिक मदत केली. तसेच शिर्डी येथे नेऊन त्यांना श्री साईबाबांचे दर्शन घडवले. शांताबाई यांना जेऊ घातले. त्यांनी स्वत:देखील त्यांच्यासोबत जेवण केले. स्नेहलताताई कोल्हे एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर शांताबाई लोंढे यांच्या कायमस्वरूपी राहण्याचा प्रश्नी त्यांनी तात्काळ सोडविला. त्यांनी शांताबाई लोंढे यांची राहण्याची व्यवस्था शिर्डी येथील द्वारका माई वृध्दाश्रमात करून दिली. मी आज म्हातारी झाले असले तरी काय झाले, माझी कला म्हातारी झाली नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया शांताबाई लोंढे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या मदतीबद्दल शांताबाईंनी त्यांचे आभार मानले.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, ज्या शांताबाई लोंढे कोपरगावकर यांनी ३०-४० वर्षांपूर्वी आपल्या सौंदर्य, आवाज व नृत्य अदाकारीने तमाशा रसिकांना भुरळ पाडली; पण आता वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होत होती. कोपरगावचा नावलौकिक वाढविणाऱ्या शांताबाई लोंढे या कोपरगावच्या रहिवासी आहेत, याची अनेकांना माहितीही नव्हते. या वयात होत असलेली हेळसांड प्रसारमाध्यमांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उजेडात आणल्यामुळे लावणीसम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे विदारक वास्तव जीवन जगासमोर आले. त्यांना शिर्डी येथे नेऊन श्री साईबाबांचे दर्शन घडवले. जेवण दिले व शिर्डीतील द्वारका माई वृध्दाश्रमात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.

शांताबाई लोंढे या दुर्लक्षित झालेल्या तमाशा कलावंताची होणारी हेळसांड थांबवत त्यांना मायेचा निवारा उपलब्ध करून दिल्याचे मोठे समाधान मला लाभले. आजही शांताबाई लोंढे यांचे कलेवरचे प्रेम कायम आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शांताबाई लोंढे यांच्यासारख्या वयोवृद्ध कलावंतांना आणखी काय मदत करता येईल, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी सांगितले. लोककलावंतांना उतार वयातही मान-सन्मान प्राप्त झाला पाहिजे. त्यांना सरकारकडून दरमहा मिळणाऱ्या मानधनाच्या रक्कमेत वाढ झाली पाहिजे यासाठी तसेच वयोवृद्ध कलावंतांना सुसह्य जीवन जगता यावे म्हणून सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.

सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी शांताबाई कोपरगावकर यांची दखल घेऊन केलेल्या मदतीने आगामी काळात शांताबाई यांना मदतीचे अनेक हात पुढे येणार आहेत.अन्न,वस्त्र,निवारा आणि आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी कलावंतांना उतार वयात काय मदत अधिक करता येईल यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सौ.कोल्हे यावेळी म्हणाल्या.शांताबाई यांना साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शनासाठी घेऊन जात सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी शांताबाई यांना सुखद अनुभव घडवला.