बिपीनदादा कोल्हे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी – कैलासशेठ ठोळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शनिवारी गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्याप्रमाणे बिपीनदादा कोल्हे हे समाजसेवेचा वारसा अखंड जपत असून, आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा आदर्श पायंडा त्यांनी सुरू केला आहे. त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे गौरवोदगार कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती कैलासशेठ ठोळे यांनी याप्रसंगी काढले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे गेल्या २० ते २२ वर्षांपासून आपला वाढदिवस हार-तुरे, शाल, भेटवस्तू व सत्कार न स्वीकारता वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, आरोग्य शिबीर यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (८ जुलै) कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलासशेठ ठोळे होते.

यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीपशेठ अजमेरे, सहसचिव सचिनशेठ अजमेरे, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, स्कूल कमिटीचे सदस्य राजेश ठोळे, संदीप अजमेरे, डॉ. अमोल अजमेरे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक नसीरभाई सय्यद,

जितेंद्र रणशूर, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, रोहण दरपेल, शक्ती परदेशी, मंगेश सोनवणे, अल्तमश शेख, श्री. गो. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका उमाताई रायते, शिक्षक दिलीप तुपसैंदर, सुरेश गोरे, अनिल अमृतकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन कैलासशेठ ठोळे म्हणाले, स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब व त्यांची सुकन्या नीलिमाताई कोल्हे-पवार हे दोघेही श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी. या दोघांचे माध्यमिक शिक्षण श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात झाले. त्यामुळे स्व. शंकररावजी कोल्हेसाहेबांना या शाळेविषयी विशेष प्रेम व आपुलकी होती. त्यांनी श्री. गो. विद्यालयाला नेहमी सहकार्य केले. आजही कोल्हे कुटुंबीय शाळेला सहकार्य करत आहे.

विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी आयुष्यभर नि:स्वार्थी भावनेने कष्टकरी शेतकरी, कामगार व समाजातील तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी काम करून कोपरगाव तालुक्यात शिक्षणाची व विकासाची गंगा आणली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, उद्योग, सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून त्यांनी कोपरगावचे नाव राज्य व देश पातळीवर नेले.

स्व. कोल्हेसाहेबांनी स्थापन केलेल्या संजीवनी शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना अभियांत्रिकी, तांत्रिक व अन्य अभ्यासक्रमाच्या दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. संजीवनी शिक्षण संस्थेत शिकलेले विद्यार्थी आज देश-विदेशात मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत, ही गौरवाची बाब आहे. स्व. कोल्हेसाहेबांच्या शिकवणीनुसार बिपीनदादा कोल्हे व त्यांची तिसरी पिढी आज समाजकारणात सक्रिय आहे. कोपरगाव तालुक्याच्या विकासात कोल्हे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, ते कधीही विसरता येणार नाही, असेही ठोळे म्हणाले.

दिलीपशेठ अजमेरे यांनी बिपीनदादा कोल्हे व कोल्हे कुटुंबीयांच्या सामाजिक व विधायक कार्याची प्रशंसा केली. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्याचा बिपीनदादा कोल्हे यांचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय व आदर्शवत आहे. मदत घेणाऱ्यांनी मदत देणाऱ्यांची भावना समजून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे ठरवून मार्गक्रमण करावे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, असा हितोपदेश त्यांनी केला.

पराग संधान म्हणाले, बिपीनदादा कोल्हे यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असून, समाजातील गोरगरीब लोकांसाठी ते सतत कार्य करत असतात. गेल्या २०-२२ वर्षांपासून ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप व शिक्षणासाठी मदत करून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. बिपीनदादांच्या वाढदिवसाला दरवर्षी दोन ते अडीच लाख वह्यांचे मोफत वितरण करण्यात येते. यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी सामाजिक उपक्रम संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात राबविण्यात आले.

कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूह संकटात नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतो. कसलाही गाजावाजा न करता गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात बिपीनदादा कोल्हे व कोल्हे कुटुंबीय नेहमीच पुढे असते. डी. आर. काले यांनी कोव्हिड महामारी, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समुहाने भरीव मदतकार्य केले असून, त्यांचा जनसेवेचा हा महायज्ञ अखंडपणे सुरू असल्याचे सांगितले. काले यांनी श्री. गो. विद्यालयातील आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सुंदर कविता सादर केल्या. कैलासशेठ ठोळे, दिलीपशेठ अजमेरे, सचिनशेठ अजमेरे व मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक सुरेश गोरे यांनी केले.