संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे नैतिक बळ वाढविण्यासाठी कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) उपक्रमांतर्गत जवानांसाठी राख्या संकलनाचा शुभारंभ झाला. ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमात माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शुभेच्छा संदेशासह आपल्या राख्या ३० ऑगस्टपर्यंत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांकडे जमा कराव्यात, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी याप्रसंगी केले.

कोपरगाव शहरातील गुरूद्वारा रोडवर असलेल्या संजीवनी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी (१८ ऑगस्ट) दुपारी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाचा शुभारंभ युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी त्यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून अमर जवान स्मृतीस्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन केले. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतमाता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान अशा घोषणांनी युवा सेवकांनी परिसर दणाणून सोडला होता.

याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले, ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीद्वाक्यानुसार सामाजिक एकता, युवा सशक्तीकरण, कृषी, आरोग्य, पर्यावरण या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठानने गेल्या आठ वर्षांत अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक नि:स्वार्थीपणे नैसर्गिक आपत्तीच्या व अडीअडचणीच्या काळात समाजातील सर्व घटकांच्या मदतीला धावून जातात. तालुक्यात आजपर्यंत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून युवकांचे मोठे संघटन निर्माण केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत संजीवनी उद्योग समूहाच्या मदतीने ५०० बेडचे संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून त्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत औषधोपचार, भोजन, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, पूरग्रस्तांना मदत, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, पाणी अडवा, पाणी जिरवा, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संतुलन, युवकांसाठी रोजगार निर्मिती आदी उपक्रमही प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात.

भारतीय जवान डोळ्यांत तेल घालून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. ते देशाच्या सीमेचे रक्षण करत असल्याने आपण मुक्तपणे वावरू शकतो. आपले सैनिक दिवाळी, दसरा असो किंवा रक्षाबंधनासाठी आपल्या गावी येऊ शकत नाहीत. बहीण-भावाच्या अतूट नात्याची आठवण करून देणाऱ्या रक्षाबंधन सणाला भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे.

या सणादिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाचे वचन घेत असते. सीमेवर लढणारे जवान आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर कर्तव्य बजावून आपल्या देशाचे संरक्षण करीत असतात. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जिवाची पर्वा न करता संरक्षण करतात, याची जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच तरुण पिढीमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येतो. 

गेल्या वर्षी या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत संकलित झालेल्या राख्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक जवानांपर्यंत पोहोचवणार आहेत. या उपक्रमात माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या शुभेच्छा संदेशासह राख्या ३० ऑगस्टपर्यंत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांकडे जमा कराव्यात. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनीनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून जवानांसाठी राख्या पाठवाव्यात, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.