आजारांना आर्युवेदाच्या माध्यमातून दूर ठेऊन दवा आणि दुवाच्या माध्यमातून जनजागृती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ : आज प्रत्येकाच्या जीवनात ताण तणाव वाढत आहे. त्यातून मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासह मानसिक आजारांची भर पडत आहे, आभासी माध्यमांच्या विळख्यात तरुण पिढी गुरफटले आहे, त्यातूनही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, या आजारांना आर्युवेदाच्या माध्यमातून दूर ठेऊन दवा आणि दुवा च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वरचे प. पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी हाती घेतले असल्याचे प्रतिपादन डॉ. मोहन गौरकर यांनी केले.

तालुक्यातील आठ वेगवेगळ्या स्वामी समर्थ केंद्रात मोफत रुग्णांची वैद्यकीय तपासणी व आर्युवेदीक उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी त्याचे उद्घाटन उपाध्यक्ष मनेष गाडे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. 

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने गोर-गरीबांच्या समस्या जाणुन घेऊन त्याचे निराकरण करण्यावर भर दिला तोच वसा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे चालवित असुन त्यांनी मोफत तालुकाभर फिरत्या दवाखान्याद्वारे विनामुल्य रुग्ण तपासनी हाती घेऊन त्यांना मोफत औषधे वितरणाचे काम सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक तास स्वच्छतेसाठी अभियान सुरू केले त्याबाबतही त्यांनी माहिती दिली त्याची अंमलबजावणी कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व तालुका केंद्रप्रमुख कैलास माळी याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी, कोळपेवाडी, कोपरगांव, निवारा, धामोरी, खोपडी धोत्रे, पोहेगांव व चासनळी या आठ केंद्रात या शिबीराचे आयोजन करण्यांत आले असुन रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा व ऍलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक उपचाराचा स्वीकार करावा. स्वामीसमर्थ जिल्हा व्यवस्थापकीय प्रमुख माणिक वडतेले यांनी हिंदू संस्कृतीतील व्रत वैकल्य साजरी करण्याबाबत मार्गदर्शन देऊन कुलधर्म कुळाचा प्रत्येकाने करावा असे सांगितले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, डाॅ. चारुशिला पाटील (पुणे), सुजाता चौधरी (मध्यप्रदेश), विलास पानगव्हाणे, वनिता भुजबळ, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मोहन गौरकर व डॉ.चारुशीला पाटील यांनी रानभेंडी, नारळाची शेंडी, विविध लुप्त होत चाललेल्या आयुर्वेदिक वनस्पती, त्याच्या मुळ्या व उपयोग याबाबतची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी केले. १६७ रुग्णांची तपासणी करून त्यांना आयुर्वेदिक औषधे देण्यात आले.