शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या ५ नोव्हेबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या १६ तारखेपासून अर्ज दाखल होणार, असल्याने सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले असून त्यात वंचित बहुजन आघाडीने “भिक नको सत्ताची, सत्ता हवी हक्काची” हा घोष घेऊन ग्रामपंचायती पासूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आधीक रंगतदार होणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, महिला तालुकाध्यक्ष संगिता ढवळे यांनी ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्या अगोदर पासून त्यांच्या गावोगावी सुरु असलेल्या घोंगडी बैठकांना वेग दिला आहे. या बैठकीत त्या गावच्या स्थानिक अडचणी समजून घेऊन त्या लगेच जागेवरच कशा सोडविता येतील यावर आघाडीचा भर आहे. त्यामुळे सर्वसाधारण स्थरातील लोक त्यांचेकडे आकृष्ट होत असल्याचे प्राथमिक चित्र आहे.
सर्व होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. चव्हाण यांनी स्वतः घोंगडी बैठकीत व्यक्त केला असून तो प्रस्थापितांना शह असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.