शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : मुलांवर होणारे संस्कार ही जगातील सर्वात मोठी संपत्ती असून मुले जर संस्कारित असतील तर गरीबीतही इतरांना हेवा वाटावा असा आदर्श संसार करता येतो. या उलट मुले जर संस्कारित नसतील तर कितीही श्रीमंती असली तरी संसाराचे वाटोळे होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे ऐहिक श्रीमंतीपेक्षा मुलाबाळा वरील संस्कार अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. येथे सुरु असलेल्या श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात कथेचे चौथे पुष्प गुंफताना ढोक महाराज निरुपण करत होते.
जीवनात निष्काम भक्ती अतिशय महत्वाची आहे. कोणत्याही फळाली अपेक्षा न ठेवता केलेली निष्काम भक्ती भगवंताला प्रिय असते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास हे वक्त्याचे भांडवल तर कथा श्रवणातून मिळणारे आचरण व परमेश्वर भक्तीचे अधिष्ठान आतिशय महत्वाचे असल्याने श्रीराम कथेचे वारंवार श्रवण केले तरीही त्याची अनुभती प्रत्येकवेळी नवी असते.
आजच्या कथेमध्ये केवळ कथेचा प्रसंग महाराजांनी विस्तृतपणे कथन केला. आमदार मोनिका राजळे, श्री क्षेत्र पैठणच्या नाथ वंशीय योगीराज महाराज, श्री क्षेत्र आळंदी येथील रामेश्वर महाराज कंठाळी, बाळासाहेब मुंदडा, आदिच्या हस्ते ग्रथपूजन व आरती करण्यात आली.