कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : ‘दीपावली’ एक प्रकाशोत्सव असत्याकडून सत्याकडे प्रवास करण्याचा, अंधाराकडून तेजाकडे, प्रकाशाकडे जाण्याचा, मृत्यूकडून अमरत्वाकडे जाण्याचा हा सण आहे. या सणाला आज जेवढे भौतिक महत्त्व प्राप्त झाले आहे, तेवढेच त्याचे आध्यात्मिक महत्व आहे. बृहदारण्यक उपनिषदांमध्ये एक प्रार्थना आहे, जी आपण दीपप्रज्वलन करताना नेहमी म्हणतो. ”ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, ॐ शांतिः शांतिः शांतिः” या प्रार्थनेचा अर्थ आहे, (हे परमेश्वरा) आम्हाला असत्याकडून सत्याकडे न्या, अंधाराकडून प्रकाशाकडे न्या, मृत्यूकडून अमरत्वाकडे न्या. आज जिकडे तिकडे असत्याचा बोलबाला आहे.
आपण दिवसभरात जेवढे शब्द बोलतो, त्यातील सत्य किती आणि असत्य किती याचा प्रश्न आपल्या मनालाच विचारला तर आपणच खजिल होऊ. नेहमी सत्य बोलावे, हे वाक्य अगदी शाळेत असल्यापासून आपल्या कानी पडत असले तरी ते आपण कितपत आचरणात आणतो, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निराश करणारेच असेल. एखाद्यापासून आपल्या जीवनातील काही गोष्टी लपविण्यासाठी वा जाणीवपूर्वक एखाद्याला आपण केलेली गोष्ट कळू नये यासाठी आपण सहज असत्य बोलून जातो. हे झाले दैनंदिन भौतिक जीवनातले सत्य-असत्य.
परंतु, या चरणामहज असत्याकडून सत्याकडे न्या, याचा अर्थ व्यापक आहे. डोळ्यांना जे दिसते ते आपण सत्य मानतो. परंतु, अध्यात्म सांगते, हे सगळे मिथ्या आहे. हे कधीतरी नष्ट होणारे आहे. सृष्टीतील झाडे-वेली, पशू-पक्षी एवढेच काय डोंगरदऱ्या यासुद्धा कायमस्वरूपी असणार नाहीत. त्यातही बदल होत राहतील व तेही नष्ट होईल.
आपल्या जीवनातील पद, पैसा, प्रतिष्ठा, नातीगोती, बालपण, तारुण्य आदी काहीच टिकणार नाही. हे सर्व नष्ट होईल. म्हणजे, हे सगळेच विशिष्ट काळापुरते आहे. हे अनंतकाळपर्यंत नाही, म्हणजे सत्य नाही. सत्य एकच आहे, जो नष्ट होत नाही, जो जन्मालाही येत नाही आणि ज्याचा मृत्यूही होत नाही, असा आत्मा. तो एकमेव सत्य आहे. असत्याकडून सत्याकडे न्या, याचा अर्थ नश्वर शरीराच्या, सृष्टीच्या प्रेमातून शाश्वत आत्म्याकडे आपली वाटचाल होवो, असा या चरणाचा अर्थ आपणास घेता येईल.
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे अग्निज्योत पेटवून त्याद्वारे अंधार नष्ट होवो. वास्तविक पृथ्वीवरील अंधार का अल्पकालीन असतो. रात्र उलटली की बारा तासांनी पुन्हा उजेड होतो. दिवसरात्रीचे हे चक्र अखंड चालूच राहणार आहे. त्यामुळे अंधारानंतर प्रकाश, प्रकाशानंतर अंधार हे अव्याहतपणे, अनंत काळ सुरू असेल. परंतु, खरा अंधार कोणता असेल तर तो अज्ञानाचा. हा अंधार दूर करणे आवश्यक आहे. वर आपण पाहिले की, आपण असत्यालाच सत्य समजून जीवन व्यतीत करीत असतो. मिथ्या गोष्टींसाठी धावत असतो. परंतु, सत्य काय आहे, तर तो आत्मा या आत्म्याचे ज्ञान नसणे म्हणजेच अंधार होय.
ज्ञानाचा अभाव म्हणजे अंधार, ध्यानाचा अभाव म्हणजे अंधार. ध्यानाद्वारे आत्म्याची ओळख करून घेतली की आपल्या अंतरात्म्यात ज्ञानाची शाश्वत ज्योत प्रकटते. मग अज्ञानरूपी अंधार कायमचा दूर पळतो. या ज्ञानज्योतीच्या प्रकाशात आपल्या जीवनाचे ध्येय, त्या ध्येयामागे वाटचाल करण्यासाठी सद्गुरूंनी दाखविलेला पदपथ आपल्याला स्पष्टपणे दिसतो. नव्हे, हा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी सद्गुरू माऊलीच स्वतः ज्ञानरूपी मशाल घेऊन आपल्या वाटाड्या बनून आपल्याला मार्ग दाखवत चालतात. हा मार्ग असतो, ध्याना नामाचा, शाश्वत सुखाचा म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे अर्थातच अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे होय.
‘मृत्योर्मा अमृतं गमय’ हे जीवन नश्वर आहे. मृत्यू हेच एकमेव सत्य आहे. जो जन्माला आले तो मृत्यू पावणारच आहे, हे वास्तव आहे. परंतु, जेव्हा देहाच्या मृत्यूचे भय नाहिसे होऊन अमर अविनाशी आत्म्याची आपल्याला ओळख होईल, ते खरे अमरत्वाकडे जाणे होय. शरीर जरी नष्ट होणारे असले तरी आत्म्याला त्याच्या गंतव्यस्थानी पोहचविणे हेच मानवजन्माचे अंतिम ध्येय असते.
हे गंतव्यस्थान म्हणजे आत्मप्राप्ती होय. आत्मा परमात्म्यात विलीन झाला की, अनंत जन्मांचे दुष्टचक्र संपते. आत्मा अविनाशी आनंदात रत होतो. हेच अमरत्व होय. एकदा का तो परमात्मरूप झाला की तो अनंत काळासाठी अमरत्व प्राप्त करतो. दीपावलीचे हे पर्व साधकांना अशा अमरत्वाकडे घेऊन जावो, अर्थात त्यांना आत्मप्राप्ती होवो.
असा हा दीपावलीचा सण केवळ भौतिक शरीरासाठीच नव्हे तर आत्मध्यानासाठी, आत्मिक उन्नतीसाठीही सर्वात महत्त्वाचा आहे. या प्रकाशपर्वात आपण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्याना नामाची ज्योत पेटवूया. या ज्योतीद्वारे मनातील अज्ञानरूपी अंध:कार दूर करून सत्य, शाश्वत असा जो आत्मा, त्याची कास धरूया.
असत्याकडून सत्याकडे म्हणजे भौतिक सुखांचा त्याग करून ज्यातून आत्मिक, अनंत सुख मिळेल अशा ध्यानाचा मार्ग अवलंबूया. अखंड ध्यानात राहून मृत्यूकडून अमरत्वाकडे अर्थात मिथ्या देहाकडून शाश्वत, सत्य अशा आत्म्याकडे जाऊया. सद्गुरू माऊलींच्या मार्गदर्शनाखाली हे चैतन्यदायी प्रकाशपर्व ध्याना – नामात व्यतीत करून जीवनात आत्मप्रकाश पेरूया. सर्वांना प्रकाशपर्वाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आत्मा मालिक
– परमपुजनीय संत परमानंद महाराज, आत्मा मालिक मिशन, कोकमठाण