कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : नवभारत वृत्तपत्र समुहाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ट्रस्टी स्नेहलता बिपीन कोल्हे यांना नवभारताच्या निर्मितीतील अतुलनीय योगदानाबद्दल आणि सामाजिक, शिक्षण, महिला बचत गट चळवळ, कृषी, सिंचन, उद्योग आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘नवभारत के शिल्पकार’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथील हॉटेल ‘ताज विवांता’ मध्ये शनिवारी (१३ जानेवारी) झालेल्या शानदार समारंभात सामाजिक, राजकीय, शिक्षण, कृषी, उद्योग, बँकिंग आदी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच राज्याच्या विकासात बहुमोल योगदान दिल्याबद्दल कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्रीमंत मालोजीराजे, ऋतुराज पाटील, ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय मुखर्जी,
प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, राजेश गोयल, जी. श्रीकांत, आयपीएस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी, सी. ए. मिलिंद काळे, शशांक परांजपे, मनीष बाठीजा, सचिन भंडारी, अर्शद उस्मानी, पराग लागू, विश्व चोरडिया, सिद्धांत चोरडिया, विनायक भोसले, डॉ. एल. आर. यादव आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘नवभारत के शिल्पकार २०२४’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भाजपच्या नेत्या खासदार पूनम महाजन, नवभारत वृत्तपत्र समुहाचे एडिटर-इन-चिफ विनोद माहेश्वरी, प्रबंध संपादक निमिष माहेश्वरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्नेहलता कोल्हे यांनी सामाजिक, राजकीय, शिक्षण, कृषी, सिंचन, उद्योग आदी क्षेत्राबरोबर महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा जनसेवेचा वारसा नेटाने पुढे चालवत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आजही सर्वसामान्य महिला, शेतकरी, उपेक्षित व वंचित समाजघटकांचे विविध प्रश्न सोडवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अविरत कार्य करीत आहेत. स्नेहलता कोल्हे यांचा महिला मंडळ ते विधिमंडळ असा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.
नवभारत वृत्तपत्र समुहाने माझ्या सामाजिक व विकासात्मक कार्याची दखल घेऊन आज मला महामहीम राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते ‘नवभारत के शिल्पकार २०२४’ या पुरस्काराने सन्मानित केले याचा अतिशय आनंद आहे. त्याबद्दल नवभारत ग्रुपचे व माहेश्वरी परिवाराचे मी मनःपूर्वक आभार मानते. या पुरस्काराने मला समाजासाठी अधिक कार्य करण्याची स्फूर्ती व ऊर्जा मिळाली असून, यापुढील काळातही जनतेची सेवा करण्याचे कार्य अखंड सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
स्नेहलता कोल्हे यांनी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून ३० हजारांच्या मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम नोंदवून या मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार होण्याचा बहुमान मिळवला. आमदार झाल्यानंतर त्यांनी कोपरगाव मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पहिल्या शंभर दिवसांतच १०० कोटींचा निधी शासनाकडून मिळवून अनेक विकास कामे मार्गी लावली. कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान असून, शासनाकडून कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघाचा कायापालट घडवला आहे.
त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात जनतेला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर शेतकऱ्यांना भेडसावणारा पाटपाण्याचा व विजेचा प्रश्न सोडविला आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांना सदैव मदतीचा हात देणाऱ्या स्नेहलता कोल्हे यांनी महिला मंडळ व महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लावून लघुउद्योग उभारण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
त्यांनी अनेक महिलांना जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व शासनाकडून अर्थसाह्य मिळवून दिले. सामाजिक भान जपत त्यांनी अडचणीच्या काळात अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नवभारत वृत्तपत्र समुहाने ‘नवभारत के शिल्पकार’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.