कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : कोपरगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणा गोपीनाथ केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी ही निवड घोषित केली.
वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सांगळे, सदस्य प्रविण कांगणे, जनार्दन कांगणे, शरद वाकळे, रंजना राजेंद्र सोनवणे, सरला केशव डोंगरे, उज्ज्वला शंकर माळी यांच्या उपस्थितीत बुधवार दि.२४ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी अरुणा गोपिनाथ केदार यांच्या नांवाची सूचना सदस्या उज्ज्वला शंकर माळी यांनी मांडली तर त्यास रंजना राजेंद्र सोनवणे यांनी अनुमोदन दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी केदार यांचे नाव घोषित केले. अरुणा केदार या गोदावरी खोरे नामदेव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे व्हाईस चेअरमन गोपीनाथ केदार यांच्या पत्नी आहेत. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर केदार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर सत्कार केला.
या निवडीबद्दल केदार यांचे राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शानिली विखे, खा. डॉ. सुजय विखे, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे, अहमदनगर जिल्हा वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रभाकर महाराज बारगळ, सरपंच संदीप सांगळे, माजी उपसरपंच प्रवीण कांगणे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.