शिक्षकांचे योगदान पिढ्या घडविण्यात मोलाचे -विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच त्यांच्यावर सुसंस्कार करून चारित्र्यसंपन्न विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. सैनिक आणि शिक्षक यांचे आयुष्य सारखे आहे. ते सतत आपल्या कुटुंबापेक्षा समाजाची अधिक वेळ सेवा करतात हे आपण कधीच विसरता कामा नये. शिक्षकांचे समाजासाठी, देशासाठी खूप मोठे योगदान असून, त्यांच्या कार्याची दखल वेळोवेळी समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. 

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप.क्रेडिट सोसायटी ही सर्व सभासद‎ शिक्षकांच्या उन्नतीसाठी मोलाचे काम करत आहे. ठेवी आणि कर्ज यात समन्वय साधून संस्था टिकवणे हे एक कौशल्य आहे, ते या संस्थेच्या संचालक मंडळाने जपले आहे, असे कौतुकोदगार त्यांनी काढले. अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. (अहमदनगर) च्या कोपरगाव व राहाता शाखेतील संस्थेच्या सभासदत्वातून सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा व गुणवंत पाल्यांना पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (२६ जानेवारी) कोपरगाव येथील ब्रह्मकुमारी राजयोग अध्यात्मिक सेवा केंद्र येथे झाला.

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष दिलीप काटे, ज्येष्ठ शिक्षक नेते व तज्ज्ञ संचालक‎ भाऊसाहेब कचरे, संचालक अप्पासाहेब शिंदे, दिलीप कोळसे, कैलास रहाणे, पुंडलिक बोठे, सूर्यकांत डावखर, बाळासाहेब सोनवणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, पिंपळे सर, जाकीर सर, गिरमकर सर यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद शिक्षक, गुणवंत पाल्य व नागरिक उपस्थित होते. यावेळी ‘सारेगमप लिटिल चॅम्पस २०२३’ ची विजेती बालगायिका गौरी पगारे हिचा सत्कार करण्यात आला. 

विवेक कोल्हे म्हणाले, ज्ञानदान हे पवित्र कार्य आहे. मला गुरुजनांकडून अर्थात शिक्षकांकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचा दैनंदिन जीवनात आजवर मला खूप उपयोग झाला व आजही होत आहे. अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. ही माध्यमिक शिक्षकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. ही संस्था शिस्तबद्ध कामकाज करून शिक्षकांचे हित जोपासत असून, संस्थेतर्फे राबविले जाणारे विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. या संस्थेचे नगर जिल्ह्यात जवळपास ११ हजार ५०० सभासद आहेत.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्या सोसायटीला मदत करण्यात मी नेहमी सोबत आहे. कधीही काही प्रश्न असल्यास मला आवाज द्या मी तुमच्या सोबत असेल असा विश्वास विवेक कोल्हे यांनी शिक्षक सभासदांना दिला. 

संस्थेच्या ७७३ कोटींच्या ठेवी सबंध जिल्ह्यात असून, संस्थेने जवळपास ९९२ कोटींचे कर्जवितरण केले आहे. ७ टक्के इतका माफक व्याजदर आहे. एका सभासदाला २५ लाख रुपये कर्ज मिळते आणि मयत सभासदांचे कर्ज माफ केले जाते व ठेवी कुटुंबाला परत केल्या जातात हे विशेष आहे. शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे या संस्थेत मोठे योगदान राहिले आहे. संस्थेच्या कोपरगाव शाखेचे २०१० साली माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. आजतागायत संस्थेच्या कोपरगाव व राहाता शाखेने नेत्रदीपक प्रगती केली आहे.

ते म्हणाले, शहीद जवान योजना, कन्यादान निधी, सूनमुख योजना, सोने तारण योजना अशा विविध योजना ही संस्था राबवित आहे. संस्थेच्या सभासदत्वातून सेवानिवृत्त सभासद कृतज्ञता सोहळा व गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केला जातो. कोपरगाव व राहाता शाखेतील सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा होत आहे.

सभासद सेवानिवृत्त होताना तो रिकाम्या‎ हाताने परत जाणार नाही, याची दक्षता‎ ही संस्था घेत असून, त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करीत आहे.‎ संस्थेसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्थेचा उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. ज्या सभासदांची मुले विशेष गुण मिळवून शिक्षणात आणि इतर क्षेत्रात यशस्वी झाली आहेत. त्यांचादेखील संस्था सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देत आहे. सेवानिवृत्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या परताव्यात दरवर्षी पाच हजार रुपये वाढविण्याचा संस्थेचा मानस कौतुकास्पद आहे.

शिक्षकांना स्वतःच्या मुलापेक्षाही आपला विद्यार्थी जर अधिक यशस्वी झाला तर त्यांना जास्त आनंद होतो हे अनेक आदर्श शिक्षकांचे उदाहरण आहे. साने गुरुजी यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे आपल्याला शिकवले. तेच संस्कार ही संस्था आपल्या कामातून जपत आहे याबद्दल विवेक कोल्हे यांनी संस्थेचे अभिनंदन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचेही विशेष अभिनंदन करून सर्व सेवानिवृत्त सभासदांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.