कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : आज प्रभु श्रीरामाचा महिमा देशभर सुरु आहे. सर्वञ राम नामाचा जप जपत आहेत. पण श्रीरामाच्या जन्माची कथा कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावापासून सुरु होते आणि श्रीरामाचा वनवास सुध्दा या भूमीत झाला म्हणूनच कोपरगावची भूमी ही पावण भूमी आहे. कोपरगावशी प्रभु श्रीरामाचं नातं हे जन्मोजन्मीच आहे. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या आजुबाजूचा संपूर्ण परिसर म्हणजे पुर्वीचा दंडकारण्य होय.
याच दंडकारण्यात शृंगऋषींच वास्तव्य होत. शृंगऋषीनीं अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसुन तपश्चर्या केली होती म्हणून त्यांच्या डोक्यावर शिंग आल्यासारखे दिसत होते. त्यामुळे लोक त्यांना शृंगऋषी म्हणत त्यांच्या तपश्चर्येचा महिमा संपूर्ण हिंद प्रांतात होता. अयोध्येचा राजा दशरथ हे श्रावण बाळाच्या मृत्युने शापित झाले होते. त्यांना पुञ प्राप्तीची आस लागली होती. अयोध्या नगरीला वारस हवा होता. अनेक प्रयत्न करुनही राजा दशरथाला पुञ प्राप्ती होत नसल्याने अयोध्या नगरी चिंतेत होती.
कोपरगावच्या भूमीत तपश्चर्या करणारे शृंगऋषींनी राजा दशरथाची इच्छा पुर्ण करण्यासाठी अयोध्येत जावून आपल्या तपश्चर्येतून दिव्य शक्तीच्या बळावर पुञकामेष्ठी यज्ञ करून राजा दशरथाला शापमुक्त केले, आणि राजा दशरथाच्या तिन्ही राण्यांच्या पोटी पुञ जन्मले त्या पैकी एक प्रभु रामचंद्र आहेत अशी अख्यायिका आजही सांगितली जाते. म्हणून श्रीराम जन्माचं नातं कोपरगावशी आहे. इतकंच नाही तर प्रभु श्रीराम, सीता व लक्ष्मण जेव्हा १४ वर्ष वनवास भोगत होते तेव्हा ते दंडकारण्यातून प्रवास करत करत लंके पर्यंत आणि लंके पासुन पुन्हा अयोध्येपर्यंत गेल्याचे सांगितले जाते.
त्या दरम्यानच्या वनवास काळातील खाणाखुणा, त्यांचा मुक्काम, वास्तव्य कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक असल्याचे पुराणकथामधून सांगितले जाते. हरिण रुपी मारीस राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीरामाने बाण मारला तेव्हा त्या बाणामध्ये इतकी गती होती की त्या बाणाने खडकाला आरपार केले होते. म्हणुन कोपरगाव तालुक्यातील चास गावांमध्ये नदीच्या खडकाला नळीसारखे रुप झाले. त्यामुळे चास गावाला चासनळी हे नाव पडले. मारीस राक्षसाचा जिथे वध झाला त्या गावाला मोर्वीस हे नाव पडले.
दंडकारण्यात वनवास भोगताना श्रीराम व सिता यांची जंगलामध्ये चुकामूक झाली. काही दिवस ते एकमेकांना शोधत होते. श्रीरामाची काळजी सीतेला लागली होती. जो पर्यंत पती राम प्रत्यक्ष भेटणार नाही तोपर्यंत कपाळाला कुंकु लावणार नाही. अशी शपथ सिताने घेतली होती. अखेर तालुक्यातील कोकमठाण येथे त्या दोघांची भेट झाली आणि सिताने आपल्या कपाळाला ज्या ठिकाणी बसुन कुंकू लावले त्या ठिकाणाला कुंकुमस्थान अर्थात कोकमठाण असे संबोधले जाऊ लागले.
या आणि अशा अनेक आख्यायिका असलेला कोपरगाव तालुका अनेक ऋषी, मुनींच्या पदस्पर्शाने पुनित झालेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावर अनेक महान तपस्वी, साधू, संताचे वास्तव्य होते आणि आजही आहे. देशभरात श्रीरामाचा जयजयकार होतोय पण त्या जयजयकारात कोपरगावच्या भूमीचा वाटा मोलाचा आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मुर्तीची प्रतिस्थापना नव्या भव्य मंदिरात होत असताना कोपरगावच्या पावन भूमीला सुध्दा अधिक महत्त्व पुन्हा प्राप्त झाले आहे.
शृंगऋषीनीं केल्या पुञकामेष्ठी यज्ञाची आठवण पुन्हा ताजी झाली. कोपरगाव तालुक्यातील महान तपस्वी साधू संताचा महिमा किती अगाध होता याची प्रचिती आज येतेय अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रभु श्रीरामाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध अख्यायिकांची चर्चा सध्या सर्वञ सुरु असली तरी कोपरगावच्या भूमीचा महिमा अगाध आहे.