कुलूप तोडून चोरट्यांनी ४.८८ लाखांचा ऐवज केला लंपास

शेवगाव प्रतिनिधी, दि .१४ : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ठाकूर पिंपळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घराची कडी व कुलूप तोडून पत्र्याच्या पेटीत असलेले सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत संदीप महादेव खेडकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी दि. १३ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास ठाकूर पिंपळगाव येथील आमच्या रहात्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी कडी कुलुप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील खोली मधील पत्र्याच्या पेटीचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम लंपास केली. तसेच घरातील सामानाची उचका पाचक केली.

घटनेची माहिती मिळताच बोधेगावचे उपनिरीक्षक सहकारी पोलिसासह घटनास्थळी पोहचले. ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन आय.पी.एस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे हे पुढील तपास करत आहे.