कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, गावच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. गावातील शाळा, मंदिरे, सहकारी सोसायटी यावरून आपल्याला गावच्या विकासाची कल्पना येते. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने नियोजनबद्ध उत्तम कारभार करून गावच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील चांगदेव बारकू कोळपे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीचे तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे उदघाटन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी (२० सप्टेंबर) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, माजी संचालक निवृत्ती कोळपे, अरुणराव येवले, संचालक राजेंद्र कोळपे, विलास वाबळे, माजी संचालक दत्तात्रय पानगव्हाणे,
भास्करराव तिरसे, सोपानराव पानगव्हाणे, मोहन वाबळे, माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, मढी बु. येथील कारभारी बाबुराव गवळी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब कारभारी गवळी, कुंभारी नं. १ सोसायटीचे चेअरमन अरुण पुंडलिक कदम, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) एन. जी. ठोंबळ, जिल्हा सहकारी बँकेचे विकास अधिकारी ए. डी. काटे, राजेंद्र देशमुख, चांगदेव बारकू कोळपे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण भाऊसाहेब कोळपे, उपाध्यक्ष कारभारी नाथू कोळपे, संचालक भाऊसाहेब चांगदेव कोळपे, भिकाजी भागाजी कोळपे, वसंतराव हरिभाऊ लकडे, बाबासाहेब दारकू कोळपे, पाटीलबा बाळू धायगुडे,
मारुती गुलाब गायकवाड, श्यामराव दलाजी जाधव, अशोक रामदास हळनोर, सुमनबाई निवृत्ती कोळपे, सिंधुबाई काशिनाथ मदने, मंगलबाई विजय नागरे, व्यवस्थापक भानुदास देवराम पानगव्हाणे, सागर ढोणे, सुनील धनवटे, डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. सय्यद, सुनील देवकर, पंडितराव चांदगुडे, वाल्मीकअप्पा कोळपे, राहणे, पुंजाजी राऊत, विजय कदम, रावसाहेब मोकळ, सुखदेव कोळपे, शब्बीरभाई शेख, पोपटराव जुंधारे, अंबादास कदम, देवराम गवळी, शब्बीरभाई पटेल, परसराम वाबळे आदींसह संस्थेचे सभासद, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते विवेक कोल्हे यांना नवभारत ग्रुपच्या वतीने दिला जाणारा ‘यंग प्रॉमिसिंग पॉलिटिशियन ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोळपेवाडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने राजेंद्र निवृत्ती कोळपे व किरण भाऊसाहेब कोळपे यांच्या हस्ते विवेक कोल्हे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. चांगदेव बारकू कोळपे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण भाऊसाहेब कोळपे प्रास्ताविकात म्हणाले, या संस्थेची स्थापना चांगदेव बारकू कोळपे यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेच्या मार्गदर्शनाखाली २७ एप्रिल १९५९ रोजी केली.
संस्थेने सभासदांना इलेक्ट्रिक मोटार, शेतीसाठी बी-बियाणे, खते पुरवून मोठी मदत केली. दुष्काळाच्या व अडीअडचणीच्या काळात सभासदांना कायम साथ दिली. तसेच संस्थेमार्फत रेशन दुकान चालवून गोरगरिबांना धान्य पुरवठा करून भरीव मदत केली. या परिसरातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले. या भागातील शेती सुजलाम सुफलाम करण्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्यासाठी जवळपास १ लाख कोटीच्या वर आर्थिक तरतूद केली आहे. ‘देशातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली असून, या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सहकारी सोसायट्यांना देण्याचे सरकारचे नियोजन आहे.
पी. एम. कुसुम योजनेअंतर्गत १३ कोटीहून अधिक शेतकरी जोडण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. नाबार्डच्या सहकार्याने बँक मित्र सहकारी संस्था तसेच मायक्रो एटीएम आपल्या संस्थेला सुरू करता येणार आहे. किसान क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होतात. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून पेट्रोल पंप, रिटेल आऊट लेट रूपांतर करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. जेनेरिक औषध केंद्राची परवानगीही मिळालेली आहे.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढावी, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी त्याचबरोबर शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी दुग्ध व्यवसाय, कुक्कुट, मत्स्य, शेळी-मेंढीपालन यासारखे जोडधंदे सुरू करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. कोपरगाव तालुक्यात दीड हजाराच्या आसपास शेततळे आहेत. मत्स्यशेतीचे फायदे लक्षात घेऊन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने नुकतीच कारखाना कार्यस्थळावर मत्स्यपालनाविषयी कार्यशाळा घेतली.
त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वी कोपरगाव तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांबरोबर कुक्कुटपालन, मत्स्यपालन, दूध संस्था, गोपी पशुखाद्य अशा अनेक अग्रगण्य सहकारी संस्था कार्यरत होत्या. काळाच्या ओघात बऱ्याच संस्था अडचणीत आल्या. या संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.