कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात वाणिज्य विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्टुडेन्ट मेंटॉरिंग समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सारथी एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी दिली आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन सारथी एज्युकेशनचे संचालक मा. राहुल मिसाळ, मा.अक्षय शेळके व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात मा.अक्षय चोळके यांनी बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधी या विषयावर प्रकाशझोत टाकत वाचन संस्कृती जोपसण्याचा सल्ला देतानांच ‘आयबीपीएस’ सारख्या बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात मा. राहुल मिसाळ यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी विषयांची तयारी कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करतांना चालू घडामोडी, गणित, इंग्लिश व बुद्धिमत्ता इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. महाविद्यालयीन युवक देशाचा आधारस्तंभ असून युवकांकडून अधिकाधिक स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादनाची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चर्चासत्राचे प्रास्ताविक करतांना प्रो.(डॉ.) संजय अरगडे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय देतानांच चर्चासत्र आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. वाणिज्य विभागप्रमुख प्रो.(डॉ.) संतोष पगारे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. स्टुडेन्ट मेंटॉरिंग समितीचे प्रमुख डॉ. रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ.वसुदेव साळुंके यांनी आभार मानले. सदर चर्चासत्रासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
चर्चासत्र यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्रा. मुकेश माळवदे, प्रा.अजित धनवटे, प्रा.सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर, प्रा. सोनाली आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, सचिव ॲड मा. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी.एस.यादव व रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी वाणिज्य विभागातील सर्वांचे अभिनंदन केले.