कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : तालुक्यातील शिंगणापुर येथील माजी सरपंच यादव कोंडाजी संवत्सरकर यांचा तीन एकर उस प्रजासत्ताकदिनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे पुर्णपणे जळून खाक झाला त्यात त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
शिंगणापुर शिवारात सर्व्हे नंबर ५९ मध्ये चारी नंबर २८ लगत यादव संवत्सरकर यांची शेती आहे. त्यात तीन एकर क्षेत्रावर त्यांनी सुरू उस लागवड केली होती, त्यांच्या शेतातुन वीज वाहक तारा गेल्या असुन त्यात झोळ पडला होता. त्याबाबत यादव संवत्सरकर यांनी लेखी, तोंडी अनेकवेळा वीज वितरण कार्यालय संवत्सर व कोपरगावच्या वरिष्ठ अधिका-याकडे कळविले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
२६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या वीजतारामध्ये घर्षण होवुन त्याची झळ त्याखालील उस पिकास बसली व संपुर्णपणे उस जळाला तो विझविण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व कोपरगाव नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबांनी प्रयत्न केला पण ज्वाळा इतक्या भयंकर प्रमाणांत होत्या, त्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तीन एकर उस पीक यादव संवत्सरकर यांच्या डोळयादेखत पुर्णपणे जळून गेले. वीज वितरण कंपनीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.