संयमी मराठा समाजाच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या यशाचे कोपरगावात जल्लोष

कोपारगाव प्रतिनिधी, दि.२८ : महायुती शासनाने समस्त मराठा समाज बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. या संयमी मराठा समाज बांधवांच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या यशाचा कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात जल्लोष साजरा करण्यात आला असून आमदार काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज बांधवांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील साडेचार महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जंरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे होत असलेली कुंचंबना व मराठा समाजाला येत असलेल्या अडचणी आपल्या आंदोलना दरम्यान वारंवार आपल्या भाषणातून शासनाकडे त्यांनी प्रभावीपणे मांडल्या होत्या व आमरण उपोषण देखील केले होते. मराठा समाजाच्या या आंदोलनाला राज्यातील प्रत्येक गावातून मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला होता व अनेक समाज बांधव देखील उपोषणाला बसले होते. यामध्ये कोपरगाव मतदार संघ देखील अपवाद नव्हता.

कोपरगाव शहरात देखील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनिल गायकवाड, विनय भगत, योगेश खालकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणीं आमरण उपोषण केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच असा मनाशी निश्चय करून मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने पायी मोर्चा काढून २६ जानेवारी रोजी कोट्यावधी मराठा बांधवांसह मुंबईत दाखल होवून आमरण उपोषण सुरू केले होते.

लोकशाहीच्या मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अत्यंत संयमाने मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले त्याबद्दल मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा बांधवांचे अभिनंदन हा मराठा बांधव, मनोज जरांगे पाटील व मतदार संघातील गावागावात उपोषणाला बसलेल्या सर्व मराठा समाज बांधवांचा व त्यांना साथ देणाऱ्या समस्त मराठा बांधवांचा विजय आहे. आपला हक्क मिळविण्यासाठी अतिशय शिस्तबध्द पद्धतीने आंदोलन करून मनोज जरांगे पाटलांनी समस्त मराठा समाजाला सोबत घेवून मराठा समाजाला मिळवून दिलेल्या आरक्षणामुळे गरीब मराठा समाजाला निश्चितपणे फायदा होणार याचा आनंद वाटत असून मराठा समाज बांधवांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. – आमदार काळे

अखेर मराठा बांधवांच्या या संयमी व विराट आंदोलनाची दखल घेऊन २७ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करून मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून आरक्षण देण्याबाबत शासनाचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. तसेच मराठा समाज बांधवांच्या संयमी आंदोलनाचे कौतुक देखील केले.

मराठा समाज बांधवांसाठी हा ऐतिहासिक असा क्षण असून मराठा समाज बांधवांसाठी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे मोठे यश असून या ऐतिहासिक यशाचा कोपरगाव शहरात उपोषण करणाऱ्या अनिल गायकवाड, विनय भगत, योगेश खालकर यांची मिरवणुक काढण्यात येवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार अशोक काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, उमा वहाडणे, यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज,श्री छत्रपती संभाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा बांधवांना पेढे भरवून शुभेच्छा देत मिरवणुकीत सहभागी झाले होते.

यावेळी चैताली काळे यांनी अनिल गायकवाड, विनय भगत, योगेश खालकर यांचा सत्कार केला. पोहेगाव येथे देखील मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला. यावेळी चैताली काळे यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.