समाजउध्दार कार्यात संतांचा अनमोल वाटा – गाडे महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : महाराष्ट्र राज्याला संताची थोर परंपरा लाभलेली असुन समाजउध्दाराचे महान कार्य संतांनी केले असे प्रतिपादन नांदुरढोक येथील ह.भ.प. अमोल महाराज गाडे यांनी केले. तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांचा चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

ह.भ.प. अमोल महाराज गाडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही संत भूमी आहे. कैवल्यमुर्ती ज्ञानेश्वर जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव, सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, चोखामेळा, सावता, गोरोबा, नरहरी, रामदास स्वामी, बहिणाबाई, गाडगेबाबा अशा असंख्य संत महंतांनी वारकरी सांप्रदायाचा पाया घातला असुन कोपरगाव तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी नदीकाठी वसलेल्या तीर्थक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी केलेली तपसाधना सचेतन असुन त्यांनी देखील समाजउध्दाराचे मोठे काम केले.   

येथील रामदासीबाबा भक्त मंडळ गेल्या ३३ वर्षापासुन त्यांचा पुण्यतिथी उत्सव भक्तीमय ज्ञानदान सोहळयातुन साजरा करते हे पंचक्रोशीयांचे भाग्य आहे. संत कुळाचा उध्दार करत असतात, त्यांच्या ठायी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे असतात. मनुष्यदेहाला संस्कार देवुन समाजामध्ये मान सन्मान देण्यांचेही ते काम करतात. दक्षिणगंगा गोदावरी नदी पवित्र असुन तीच्या काठी झालेली तपसाधना अनंतकाळाची उर्जा आहे.

परमेश्वरांने गाय, बैल, जलचर प्राणी आडवे बनविले पण फक्त मनुष्यदेह सरळ बनविला तेंव्हा जन्मदात्या ईश्वराचे प्रत्येकाने नामस्मरण करावे. २२ जानेवारीला भारत देशाचा जगात डंका वाजला कारण यादिवशी अयोध्येत भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा झाली सुमारे साडेसातशे कोटी जनतेने एकाचवेळी रामनामाचा उच्चार करून इतिहास घडविला आहे.

प्रत्येकाच्या जीवनांत संत सहवास महत्वाचा आहे. संतामुळे कुळाचा उध्दार होतो, वासनेचे बीज जळून जाते, संत स्वतःबरोबरच समाजाला घडविण्याचे काम करतात, संतांनी स्वतःचे आयुष्य समाजासाठी समर्पीत केलं. भगवंताला कदापीही विसरू नका, त्याला शरण जा तोच खरा तारणहार आहे, गर्व कधीही होउ देवु नका असेही ते म्हणाले.