शेवगाव प्रतिनिधी, दि.३१ : महसूल विभागात आपली नियुक्ती झाल्याने जनतेच्या सेवेची उत्तम संधी आपणां सर्वाना मिळाली आहे. आपल्याकडे काम घेऊन येणारा सामान्य नागरिक हा आपलाच बांधव आहे. या भावनेने त्याचे काम समजून घेऊन मार्गी लावावे. असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी येथे केले.
शेवगाव तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार हजर झाले. त्यानिमित्त तहसीलदार सांगडे यांच्या उपस्थितीत त्यांचे घरगुती स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार रवी सानप, मंडल अधिकारी श्रीनिवास आव्हाड, संदीप चौधर, शशिकांत देऊळगावकर, गणेश हुलमुखे, सदानंद बारसे, विजय नेमाने, विजय चव्हाण, अर्चना गर्जे, एस.डी महापुरे आदि ची उपस्थिती होती.
शेवगाव तहसील कार्यालयात असलेल्या एकूण १२७ पदांपैकी तब्बल ३५ विविध पदे रिक्त आहेत. त्यात प्रमुख पदापैकी चार नायब तहसीलदारांपैकी तीन नायब तहसीलदार, १६ लिपिकापैकी ११ तर ४५ तलाठ्यापैकी १६ तलाठी पदे रिक्त होती. यामुळे अनेक कामे वेळेच्या वेळी होण्यात अडचणी येतात. रिक्त पदे भरण्या बाबत सर्वच स्थरातून मागणी होत असे. त्याची काही प्रमाणात दखल घेण्यात येऊन तीन नायब तहसीलदाराच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
बुधवारी दि.३१ ला नगर कार्यालयातून निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले, निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र बकरे तर निलेश वाघमारे हे श्रीगोंद्या हून येथे आले असून त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार म्हणून कार्यभार स्विकारला आहे. यावेळी शेवगाव तालुका तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष किशोर पवार यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार सानप यांनी आभार मानले.