शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : महाराष्ट्र राज्य सरकारचे “वैशिष्ट्यपुर्ण योजना” अंतर्गत शेवगाव नगरपरिषद व पाथर्डी नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी २५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
या निधीमुळे शेवगाव-पाथर्डी शहरांच्या विकास कामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या विकास कामांसाठी आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. या मंजूर निधीमध्ये दोनही शहरातील कॉक्रीट रस्ते, बंदीस्त गटार, स्ट्रीट लाईटची कामे, पेव्हींग ब्लॉक, रस्ते खडीकरण डांबरीकरण, सभामंडप आदी कामांचा समावेश आहे.
सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले. शेवगाव-पाथर्डी नगरपरिषद अंतर्गत सुरू झालेल्या विकास कामामुळे नागरिकांत उत्साहाचे वातावरण असून भविष्यातील विकास कामांसाठी नागरिकांना आमदार राजळे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत.