सध्याच्या काळात बहुआयामी व्यक्तिमत्व गरजेचे – डॉ.गोरक्ष गर्जे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या असुन विद्यार्थ्यांच्या गुण पत्रिकेवरील केवळ गुण स्पर्धेत टिकण्यासाठी पुरेसे नाहीतर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वेगवेगळ्या पैलुंची रूजवण करून बहुआयामी व्यक्तिमत्व विकसीत करावे, यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नासिक विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) प्रायोजित व संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निक आयोजित राज्य स्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धांच्या (क्वीज कॉम्पिटिशन) उद्घाटन प्रसंगी डॉ. गर्जे प्रमुख उद्घाटक म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले.

यावेळी एमएसबीटीई, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे असिस्टंट सेक्रेटरी प्रा. परमेश्वर सोळंकी, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, पॉलिटेक्निक प्राचार्य ए. आर. मिरीकर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख प्रा. जी.एन. वट्टमवार, पॉलिटेक्निक नियमन मंडळाचे सदस्य, उद्योेजक मिलिंद तारे, विरेश अग्रवाल, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘बेस्ट टिचर’ पुरस्कार प्राप्त झाल्याबध्दल व डॉ. पी. व्ही. ठोकळ यांनी पीएच.डी ही पदवी प्राप्त केल्याबध्दल डॉ. गर्जे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा.वट्टमवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धे बाबत माहिती दिली. प्राचार्य मिरीकर यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांची माहिती देवुन संजीवनी पॉलिटेक्निकच्या विविध उपलब्धींबाबत सांगीतले.  

यावेळी प्रा. सोळंकी यांनी सांगीतले की, एमएसबीटीई मार्फत राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची रचना उद्योगाभिमुख करण्यात येत असुन विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्ये विकसीत होण्यासाठी एमएसबीटीई मार्फत शोध निबंध, प्रकल्प प्रदर्शन, तांत्रिक प्रश्नमंजुषा, अशा अनेक स्पर्धा घेवुन विजयी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्य, सभाधिटपणा, आत्मविश्वास बळावत असुन त्यांना मुलाखतीच्या वेळी अशा विविध कौशल्यांची मदत होत आहे.  एक दिवसीय राज्य स्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नागपुर व छत्रपती संभाजीनगर विभागातुन एकुण ३७ टीम्सने सहभाग नोंदविला. यात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, यवतमाळने रू १५००० चे रोख प्रथम बक्षिस जिंकले.

नासिकच्या संदिप फाऊंडेशनने रू १०,००० चे रोख दुसरे बक्षिस जिंकले तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, नासिक ने रू ५००० चे तिसरे बक्षिस जिंकले. स्पर्धेचे समन्वयक प्रा. एस. पी. तनपुरे यांचेसह मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.