शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : तालुक्यातील विविध ठिकाणी शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक होण्याची शक्यता असून शेअर मार्केटमुळे तालुक्यातील वातावरण दूषित झाले आहे. संबंधित घोटाळा उघडकीस आणून कारवाई करावी. अशी मागणी करुन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी, बुधवारी पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ विश्वनाथ साळवे, भाजप एससी, एसटी तालुकाध्यक्ष मधुकर पोपट वाघमारे, अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेकांनी एक एक रुपया गोळा करुन, शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवले आहे. परंतू हे शेअर्स मार्केटवाले जनतेची दिशाभूल करुन कधी पळून जातील हे सांगता येणार नाही. अशातच पळून गेलेले, शेअर्स मार्केटवाल्याचे साथीदार कार्यरत आहे.
या परिसरात अधिक परतावा देवून तथाकथित शेअर घोटाळा प्रकरणाद्वारे गंडविले जाण्याचा मोठा फंड काही दिवसा पासून राजरोस सुरु आहे. यातील काही डॉन मंडळीनी आपला गाशा गुंडाळून पोबारा केल्याच्याही मोठी चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात तक्रार करणारा पुढे येत नव्हता. या कार्यकर्त्यानी निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी किमान हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे, हे निश्चीत.
प्रशासनाने वेळेत शेअर्स मार्केटची चौकशी करुन लवकरात लवकर आळा घालावा. तालुक्यातील जनतेची दिशाभुल होवून फसवणुक होवू नये ही, प्रामाणीक इच्छा आहे. दिलेल्या या निवेदनाची वेळेत दखल घ्यावी अन्यथा आम्ही आपल्या तहसील कार्यालया समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.