भर उन्हाळ्यात चाळीस कुटुंब बेघर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : मुर्शतपूर शिवारातील मांढरे वस्ती येथील पाटबंधारे विभागाच्या जागेत गेल्या तीन पिढ्या पासून वास्तव्यास असलेल्या चाळीस कुटुंबाना रखरखत्या उन्हात पाटबंधारे विभागाने अतिक्रमणे काढून त्यांचे संसार उघड्यावर केले आहे. डोळ्या देखत घरे उद्वस्त होत असताना मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते.

या घटनेची अधिक माहिती अशी कि, मुर्शतपूर शिवारातील गट क्र ५५ /५ व ५५/६ मांढरे वस्ती येथील पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेवर येथे तीन पिढ्यापासून चाळीस कुटुंब वास्तव्यास होते. गावातील अंतर्गत गटबाजीतून या जागेत राहणाऱ्या लोकांनी हि जागा सोडून इतरत्र जावे अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर गावातील काही लोकांनी न्यायालयामध्ये धाव घेवून संबंधित जागेवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यासाठी अनेक वर्षापासून लढा सुरु केला.

कोपरगाव तालुक्यात दुसऱ्यांदा एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर राहते घरे उद्वस्त करण्याची घटना घडली. याआधी धोंडेवाडी येथे गावातील अंतर्गत गटबाजीमुळे अख्खे गाव शासनाच्या वतीने उद्धस्त करण्यात आले होते. त्या घटनेची पुन्हा आज आठवण आली.  

अखेर उच्च न्यायालयाने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना सदर अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे एकलव्य आदिवाशी परिषदेचे अध्यक्ष मंगेश औताडे यांनी तेरा मार्च पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित कुटुंबियांसह उपोषण व इतर आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. परंतु न्यायालयाचे आदेश असल्याने अखेर कोणाचे काही हि चालले नाही. पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचारयांनी मिळून चाळीस कुटुंबियांचे घरे जेसीबीच्या सहय्याने भुइसपाट केले.

वाढत्या उष्णतेमुळे बेजार झालेल्या आदिवासी दलित कुटुंबाना आपला संसार आणि लहान मुले वाचविण्यासाठी संसार सुखरूप ठेवण्यासाठी पळापळ करावी लागली. दरम्यान उध्वस्त झालेल्या कुटुंबाना राजकीय आधार मिळण्याची आवश्यकता असल्याची भावना यावेळी सदर कुटुंबीयांनी व्यक्त केली. तसेच आमचे पुनर्वसन त्वरित करावे अशी मागणी करीत आपला आक्रोश शासनच्या विरोधात व्यक्त करीत होते. हतबल झालेल्या सर्व कुटुंबानी प्रशासनाला अतिक्रमणे काढण्यास मदत केली. त्यामुळे कोणता हि अनुचित प्रकार न घडता सर्व अतिक्रमणे काढण्यास स्थानिक प्रशासनाला यश आले.