न्यू इंग्लिश स्कूल काकडीच्या विदयार्थ्यांना मिळतेय शुद्ध पाणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला नरेश राऊत फाउंडेशन या सेवा भावी संस्थेतर्फे नुकताच आर.ओ. प्लॅंट भेट देण्यात आला असून त्यामुळे शाळेतील विदयार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाली असून पालकांनी व शिक्षकांनी नरेश राऊत फाउंडेशनचे आभार मानले आहे.

काकडी व परिसरातील आजूबाजूच्या दुष्काळी गावातील गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुमारे दोन दशकापूर्वी मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी माध्यमिक विदयालय सुरु केले. ५ वी ते १० पर्यत शिक्षण घेत असलेल्या या विदयालयाची आजची विदयार्थी संख्या २९७ असून आजवर २००० पेक्षा जास्त विदयार्थी आपले माध्यमिक शिक्षक पूर्ण करून मोठ्या शहरात व विमान प्राधिकरणात उच्च पदावर कार्यरत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे. 

शाळेच्या अवतीभोवती अनेक भौतिक सुविधा व निसर्गरम्य परिसर असून पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या बोरवेलला पुरेसे पाणी देखील आहे. हे पाणी शुद्ध करून विदयार्थ्यांना मिळावे यासाठी यापूर्वी देखील शाळेला सरळ हाताने मदत करणाऱ्या नरेश राऊत फाउंडेशन या सेवा भावी संस्थेकडे पालक व शाळेने आर.ओ. प्लॅंटची मागणी केली होती.

शाळेला असलेली आर.ओ. प्लॅंटची गरज व शुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे विदयार्थ्यांचे आरोग्य जपले जाणार होते. त्यामुळे सदरच्या मागणीची तातडीने दखल घेऊन नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत यांनी पुढाकार घेत काकडीच्या न्यू इग्लिश स्कूलला आर.ओ. प्लॅंट सप्रेम भेट दिला आहे. नुकतेच नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत व सचिव लक्ष्मणराव गोर्डे यांच्या हस्ते या आर.ओ. प्लॅंट चे लोकार्पण देखील करण्यात आले आहे.

याप्रसंगी काकडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गुंजाळ, काकडीचे पोलीस पाटील मधुकर गुंजाळ, मल्हारवाडीचे पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ, मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, शगीर शेख, जयश्री पानसरे, सुजाता नेहे, साजन पोकळे तसेच काकडी व परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते. आर.ओ. प्लॅंट कार्यान्वित करण्यात आला असून शाळेतील विदयार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.